लक्ष्मण मोरे
पुणे : शहरातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता या साथीला अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे महापालिकेने शहर पोलिसांसोबत शहरात विना मास्क फिरणाऱ्यांविरुद्ध आणि थुंकी बहाद्दरणविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. काही लोकप्रतिनिधीही बेजबाबदारपणे वागू लागले आहेत.गुरुवारी ( दि. १०) सकाळी आपल्या आलिशान मोटारीमधून चार मित्रांसह विनामास्क जात असलेल्या नांदेडचेआमदार अमरनाथ अनंतराव राजूरकर यांना पालिका - पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. या आमदाराकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आमदाराने बघून घेण्याची धमकी दिल्यानंतरही आपल्या कर्तव्यापासून हे कर्मचारी जराही विचलित झाले नाहीत.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरांमध्ये पोलिसांच्या मदतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणावर दंड वसुलीची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत शहरात वीस हजारपेक्षा जास्त लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी तसेच कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शास्त्रीनगर चौकामध्ये कारवाई करत होते. .गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आलिशान मोटारीमधून (एमच २६, बीआर ५९९९) चौघे विनामास्क जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वाहन चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. परंतु, वाहन चालकाने गाडी थांबली नाही. तो तसाच भरधाव पुढे निघाला. गाडीतील सर्व विनामास्क असल्याने पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर गाडी अडविली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चालकाला तुम्ही सर्व विनामास्क फिरत असल्याने दंडाची पावती करावी लागेल असे सांगितले. त्यावर चालकाने हुज्जत घालत गाडीमध्ये आमदार बसले आहेत; त्यांची तुम्ही पावती करणार का असा प्रश्न केला. त्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा नियम राज्य शासनाने केलेला असून सर्वसामान्य नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना नियम सारखेच आहेत असे सांगितले.
...........
विधानसभा सभापतींकडे करणार तक्रारआम्ही मुंबईहून अधिवेशनावरून आलो होतो. नांदेडला निघालो होतो. गाडीत नियमाप्रमाणे तीनच व्यक्ती होते. आमच्या गळ्यात मास्क होते पण ते तोंडाला लावलेले नव्हते. पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केली. गाडीला काठी मारली. आम्ही वाद नको म्हणून रीतसर नियमाप्रमाणे पावती केली आहे. परंतु, आम्हाला चुकीची वागणुल देण्यात आली. या प्रकरणाची विधानसभा सभापतींकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहे.- अमरनाथ राजूरकर, आमदार, नांदेड