पुणे महापालिकेचं रिचार्ज संपलं; आऊट गोइंग २ तास बंद, अधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 10:07 IST2025-05-20T10:06:58+5:302025-05-20T10:07:26+5:30

महापालिकेत वेगवेगळ्या विभागांच्या बैठका असल्याने एकमेकांना निरोप देण्यात अडथळे निर्माण झाल्याने अधिकारीही चांगलेच संतापले

Pune Municipal Corporation's recharge runs out; Outgoing services closed for 2 hours, officials angry | पुणे महापालिकेचं रिचार्ज संपलं; आऊट गोइंग २ तास बंद, अधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

पुणे महापालिकेचं रिचार्ज संपलं; आऊट गोइंग २ तास बंद, अधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

पुणे : महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाइलचे बिल न भरल्याने सोमवारी दुपारी सर्व ११०० मोबाइल नंबरचे आउटगाेइंग दोन तास बंद झाले होते. त्यातच महापालिकेत वेगवेगळ्या विभागांच्या बैठका असल्याने एकमेकांना निरोप देण्यात अडथळे निर्माण झाल्याने अधिकारीही चांगलेच संतापले होते.

महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एका खासगी मोबाइल कंपनीकडून ११०० मोबाइल नंबर घेतले आहेत. ही सेवा पोस्टपेड असून, त्याचे बिल महापालिका भरते. कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्तीनंतर ते कार्ड स्वत:च्या नावावर करून ते वापरतात. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जवळपास तीन ते साडेतीन हजार कार्ड आहेत. मागील दोन दिवसांपासून यातील अनेक मोबाइल क्रमांकावर बिल न भरल्याने आउटगोइंग आणि इंटरनेट सेवा बंद करण्याच्या सूचना येत होत्या. काही अधिकाऱ्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागास त्याची कल्पनाही दिली. मात्र, बिले भरली आहेत, असे सांगण्यात आले. मात्र, सोमवारी दुपारी १ नंतर अनेक अधिकाऱ्यांची सेवा बंद झाली. त्यानंतर तातडीने सर्वांनी ही माहिती संबंधित विभागास कळविली. त्यानंतर जवळपास दोन तासांनी सेवा पूर्ववत झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

महापालिकेची मोबाइलची कोणतीही बिले थकलेली नव्हती. संबंधित कंपनीची ही चूक आहे. त्यांना पालिकेकडून नोटीसही बजाविण्यात येणार असून, कंपनीकडे तक्रार केली जाणार आहे. - राहुल जगताप (माहिती व तंत्रज्ञान अधिकारी)

Web Title: Pune Municipal Corporation's recharge runs out; Outgoing services closed for 2 hours, officials angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.