१० हजार लोकसंख्या असलेल्या पाटील इस्टेट झोपडपट्टीत पुणे महापालिका करणार तातडीची कामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 09:46 IST2025-09-19T09:45:53+5:302025-09-19T09:46:14+5:30
ड्रेनेज लाइन दुरूस्ती, नव्याने पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येईल

१० हजार लोकसंख्या असलेल्या पाटील इस्टेट झोपडपट्टीत पुणे महापालिका करणार तातडीची कामे
पुणे : शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये १० हजार नागरिक राहतात. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी समस्या ठाण मांडून बसल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना या समस्यांपासून सुटका मिळावी, यासाठी महापालिकेकडून तातडीने कामे केली जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
शहरातील झोपडपट्ट्या आणि एसआरए वसाहतींमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक सुविधांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला महापालिकेच्या विविध विभागांसह एसआरएचे अधिकारीदेखील उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने शिवाजीनगर येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या पाटील इस्टेट झोपडपट्टीतील दुरवस्थेबाबत चर्चा झाली. या संदर्भात माहिती देताना आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले, पाटील इस्टेट झोपडपट्टी दाटीवाटीची आहे. येथे लोकसंख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. दुरवस्थादेखील झाली असून ड्रेनेज लाइन फुटल्या आहेत. तेथे सफाईसाठी दोनच सेवक असल्याने अस्वच्छच असतात. या पार्श्वभूमीवर ड्रेनेज लाइन दुरूस्ती, नव्याने पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येईल. जुन्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून कायम स्वच्छता राहील यासाठी सफाईची जबाबदारी वसाहतीतील नागरिकांकडेच देण्यात येणार आहे. लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येतील, असेही राम यांनी नमूद केले. एसआरएच्या वसाहतींमधील स्वच्छतेबाबतही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.