पुणे महापालिकेची अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई; चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ८८ अनधिकृत होर्डिंग्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:06 IST2025-07-25T11:05:53+5:302025-07-25T11:06:57+5:30
शहरातील चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सापडलेल्या ८८ पैकी २४ अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करून ते काढून टाकण्यात आले आहेत

पुणे महापालिकेची अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई; चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ८८ अनधिकृत होर्डिंग्ज
पुणे: नगररस्ता-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्जबाबत खोटी माहिती दिल्याप्रकरणी एका वरिष्ठ लिपिकाला निलंबित करण्याची कारवाई केली होती. या कारवाईचा धसका पालिकेच्या अन्य क्षेत्रीय कार्यालयांनी घेतला आहे. त्यामुळे शहरातील चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सापडलेल्या ८८ पैकी २४ अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करून ते काढून टाकण्यात आले आहेत.
शहरात महापालिकेने मान्यता दिलेले २ हजार ६४० अधिकृत होर्डिंग्ज आहेत. पालिकेने पावसाळ्यातील खबरदारीच्या अनुषंगाने तातडीने अनधिकृत होर्डिंग्ज काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले होते. त्यानंतर १४ क्षेत्रीय कार्यालयांनी दिलेल्या अहवालात शहरात केवळ २४ अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग्ज) असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी तत्काळ हे होर्डिंग्ज तातडीने काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने २२ होर्डिंग्ज काढले असून, दोन होर्डिंगबाबत वाद सुरू आहे. त्यानंतरही अनधिकृत होर्डिंग्जला अधिकारीच आर्थिक देवाण-घेवाणीतून पाठबळ देत असल्याने आयुक्तांकडून अशा अनधिकृत होर्डिंग्जची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांना सादर केलेल्या अहवालात नगररस्ता - वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत केवळ ७ अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचे नमूद केले होते. मात्र, आयुक्तांच्या आदेशात नेमण्यात आलेल्या पथकाने तब्बल ३५ अनधिकृत होर्डिंग्ज शोधून काढले. त्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, हा खुलासा दिशाभूल करणारा होता. त्यामुळे नगररस्ता - वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या परवाना निरीक्षक वरिष्ठ लिपिकाला निलंबित तर, कनिष्ठ लिपिकाची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली होती. त्यानंतर नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय ३५, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय ३७, वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय ११ आणि येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय ५ असे एकूण ८८ अनधिकृत जाहिरात फलक आढळले. त्यापैकी नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाने १५, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय १, वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय ३, हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय ५ या प्रकारे २४ अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केल्याचे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.