पुणे महापालिकेने शहरातील २६ पैकी सुरु केली पाच वाहनतळं; रस्त्यावरील वर्दळ वाढल्याने निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 16:18 IST2020-06-09T16:05:26+5:302020-06-09T16:18:45+5:30
बंद असलेले उद्योग व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.

पुणे महापालिकेने शहरातील २६ पैकी सुरु केली पाच वाहनतळं; रस्त्यावरील वर्दळ वाढल्याने निर्णय
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट मिळाल्यानंतर शहरातील व्यवसाय आणि खासगी कार्यालये सुरु झाली आहेत. नागरिक खरेदी व दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडू लागले आहेत. नागरिकांच्या वाहनांना पार्किंग उपलब्ध करुन देण्याकरिता महापालिकेने वाहनतळं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या मालकीच्या २६ वाहनतळांपैकी पाच वाहनतळं सुरु करण्यात आली असून उर्वरीत वाहनतळं टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत.
बंद असलेले उद्योग व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर २४ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर जसजशी कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढली तसतसा लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आले. त्यानंतर कंटेन्मेंट झोनही तयार करण्यात आले. नागरिकांना बाहेर पडता येत नसल्याने रस्ते ओस पडले होते. रस्त्यावर वाहनांची अजिबात वर्दळ नव्हती. सर्व व्यवहार, दुकाने, व्यापार, व्यवसाय आणि नोकरीची ठिकाणे, कार्यालये बंद असल्याने नागरिकही बाहेर पडत नव्हते. लॉकडाऊनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमध्ये मात्र कंटेन्मेंट झोन वगळता अन्य ठिकाणी काही प्रमाणात सवलती देण्यात आल्या. अत्यावश्यक सेवांसह अन्य सेवाही सुरू करण्यात आल्या. पालिकेची विकासकामे हळूहळू सुरू करण्यात आली आहेत.
लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू करतानाच केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आणखी सवलती दिल्या जाण्याची शक्यता असून कंटेन्मेंट झोनमध्ये कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत. शहरातील बºयापैकी दुकाने, व्यवसाय आणि उद्योग सुरू झाले आहेत. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून खासगी कार्यालयेही सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात नागरिकांची वर्दळ वाढली असून वाहनांची संख्याही वाढू लागली आहे.
======
ही वाहनतळं झाली सुरु
हमालवाडा कुमठेकर रस्ता, नारायण पेठ
७०९/७१० कुमठेकर रस्ता, नारायण पेठ
भानूविलास पार्किंग नारायण पेठ
पीएमपीएमएल टर्मिनस कात्रज
तुकारामशेठ शिंदे वाहनतळ पुणे स्टेशन
======
मंडई परिसरातील मिनर्व्हा-आर्यन ही वाहनतळंही लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. फर्ग्युसन रस्त्यालगत असलेल्या शिरोळे रस्त्यावरील दोन वाहनतळांसह रास्ता पेठेतील राजर्षी शाहू महाराज उद्यान, अल्पना सिनेमागृहासमोरील वाहनतळ, सारसबागेजवळील नवलोबा मंदिर वाहनतळ, सातारा रस्त्यावरील डिसीजन टॉवर पार्किंग सुद्धा सुरु करण्यात येणार आहे.
======
कंटेन्मेंट एरियामधील तसेच या भागालगत असलेली वाहतनळं तूर्तास सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, गणेश कला क्रिडासह आण्णाभाऊ साठे सभागृह येथे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आलेला असल्याने ही वाहनतळे बंद राहणार आहेत. तर, औंधचे भीमसेन जोशी कलादालन, बालगंधर्व रंगमंदिर, पेशवे उद्यान, राजीव गांधी उद्यान, कात्रज येथील वाहनतळं बंदच ठेवण्यात येणार आहेत.