पुणे: महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचना भाजपचे पालिकेतील माजी पदाधिकारी आणि नेत्यांना अनुकूल झाली आहे. मात्र, भाजपच्या काही माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडल्यामुळे अनसेफ झाले आहेत. नगरविकास खाते शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रभागरचना सेफ झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडले आहेत. त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाची कोंडी झाली आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना आज जाहीर करण्यात आली. महापालिकेची प्रभागरचना करताना भाजपने विश्वासात न घेता परस्पर प्रभागरचना करून घेतल्याचा आरोप शिवसेनेच्या शिंदेसेनेने केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याचा कारभार असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागांमध्ये काही बदल करत शिवसेनेला फायद्याचे ठरतील असे काही प्रभाग झाले आहेत. महापालिकेत भाजपचे माजी पदाधिकारी प्रभागरचनेसाठी प्रयत्नशील होते. त्यांनी प्रभागरचना अनुकूल करून घेतली आहे. पण भाजपचे काही माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांना प्रभागरचना अनुकूल नाही. त्यामुळे भाजपचे काही कार्यकर्ते नाराज झाले आहेत. प्रभागरचनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सेफ झाले आहेत. मात्र, अनेक माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडले आहेत. त्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही माजी नगरसेवक नाराज झाले आहेत.
भाजपात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचे प्रभाग अनसेफच
पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत भाजपमध्ये अन्य पक्षांतून प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचे प्रभाग हे अनसेफ झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रभागाची मोडतोड
प्रारूप प्रभागरचनेत महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रभागाची अक्षरश: मोडतोड करण्यात आली. त्यात कॉग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह माजी नगरसेवकांच्या प्रभाग तोडले आहेत.
भाजप आणि शिंदे सेनेच्या शीतयुद्धाचा अजित पवार गटाला फटका
पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदेगटाचे शीतयुद्ध सुरू होते. त्यामुळे राज्याच्या नगरविकास विभागाने प्रभागरचना निवडणूक आयोगाकडे उशिरा सादर केली. त्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची प्रभागरचना अनुकूल करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडले. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेच्या शीतयुद्धाचा अजित पवार गटाला फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
कसबा नाव वगळले
पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेत कसबा हे नाव काेणत्याही प्रभागाला देण्यात आलेले नाही. पुणे म्हणजे कसबा पेठ असे समीकरण आहे. त्यामुळे कसबा हे नाव नसल्यामुळे या भागातील नागरिक नाराज झाले आहेत. याउलट शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पर्वती, हडपसर ही विधानसभा मतदारसंघांची नावे प्रभांगाना आली आहेत.