पुणे : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अनेक आरोग्य निरीक्षकांचा पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच भागात कार्यकाल असल्याचे उघडकीस आले होते. त्या आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले होते. जुलैमध्ये समुपदेशनाने बदल्या झाल्यानंतर एका माजी पदाधिकाऱ्याने राजकीय दबाव आणल्याने रखडल्या होत्या. अखेर अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
पालिका आयुक्तपदाचा नवल किशोर राम यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागात त्यांनी मोठ्या प्रमाणावर बदल करण्यास सुरुवात केली. यावेळी पाच वर्षांहून अधिक काळ काही आरोग्य निरीक्षक एकाच भागात कार्यरत असल्याचे समोर आले. त्यानंतर ५३ आरोग्य निरीक्षक आणि ६ वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्यांची यादी तयार केली. समुपदेशन करून क्षेत्रीय कार्यालय निवडण्याचा त्यांना पर्याय दिला. अतिरिक्त आयुक्तांनी आदेशावर सही केली.
मात्र, काही निरीक्षकांनी आर्थिक हितसंबंध सांभाळण्यासाठी राजकीय नेत्यांचा आधार घेतला. एका माजी नगरसेवकाने अधिकाऱ्यांवर दबाव आणून बदल्यांची अंमलबजावणी करू नये, असा दबाव आणला. प्रशासनानेही गणेशोत्सवात बदल्या केल्यास कामावर परिणाम होईल, असे सांगत बदल्या थांबविल्या होत्या. मात्र, अतिरिक्त आयुक्तांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आता आरोग्य निरीक्षकांना बदलीच्या ठिकाणी तातडीनं रुजू व्हावे लागणार आहे.