पुणे :पुणे शहरातील महिलांच्या मालकी हक्काला प्रोत्साहन देण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के मिळकत करमाफी देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या नावावर मालमत्ता नोंदणी वाढण्यास चालना मिळणार आहे. महिलांसाठी शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी १०० मोफत स्वच्छतागृहांची उभारणी केली जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या २०२६- २७ अर्थसंकल्प श्रीनाथ भिमाले यांनी सादर केला. त्यामध्ये सशक्त महिला -सक्षम समाज यावर भर देण्यात आला आहे. महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार असून, येथे महिला उद्योजक, बचत गट आणि विविध क्षेत्रांतील महिलांसाठी प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रदर्शन आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किशोरवयीन मुलींच्या आरोग्य आणि मानसिक सक्षमीकरणासाठी महापालिकेच्या ७५ शाळांमध्ये ‘तीची हक्काची जागा’ या संकल्पनेंतर्गत पिंक रूम विकसित करण्यात येणार आहेत.
या माध्यमातून डिजिटल समुपदेशन आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजनेची पुनर्रचना करण्यात येणार असून, त्यामध्ये कौटुंबिक सल्ला, कायदेशीर मार्गदर्शन आणि समुपदेशन सेवा देण्यात येणार आहेत. तसेच, महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढीस लागावी, यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करून ज्युदो, कराटे, लाठी-काठी, योगासने यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
बचत गटांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास, उद्योजकता प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय व्यवसाय प्रशिक्षण, दहावी-बारावीतील विद्यार्थिनींसाठी खासगी शिकवण्या, सीईटी परीक्षेसाठी अर्थसाह्य, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी अनुदान, मुलगी दत्तक योजना, रमाई स्वावलंबन योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
Web Summary : Pune offers 50% property tax exemption on properties up to 500 sq ft for women until 2026, alongside initiatives for women's empowerment like free sanitation, entrepreneurship support, pink rooms in schools, and skill development programs.
Web Summary : पुणे में 2026 तक महिलाओं के नाम पर 500 वर्ग फुट तक की संपत्तियों पर 50% संपत्ति कर छूट, मुफ्त स्वच्छता, उद्यमिता समर्थन, स्कूलों में पिंक रूम और कौशल विकास कार्यक्रमों जैसी महिला सशक्तिकरण पहलों के साथ।