E-Shivneri : ‘ई-शिवनेरी’चा पुणे-मुंबइ प्रवास धाकधुकीतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 19:44 IST2025-07-10T19:31:36+5:302025-07-10T19:44:50+5:30

पुरेशी चार्जिंग नसल्यास मार्गावर बसच सोडू नका, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Pune-Mumbai journey of E-Shivneri in Passengers are asking when the ST administration will pay attention | E-Shivneri : ‘ई-शिवनेरी’चा पुणे-मुंबइ प्रवास धाकधुकीतच

E-Shivneri : ‘ई-शिवनेरी’चा पुणे-मुंबइ प्रवास धाकधुकीतच

पुणे : स्वारगेट, पुणे स्टेशन या दोन्ही आगारांतून बोरिवली, दादर आणि ठाणे या तिकाणी दर अर्ध्या तासाला ई-शिवनेरी बस धावतात. पुणे स्टेशन आणि स्वारगेट मुख्यालयात ई-शिवनेरी बस चार्जिंग केल्या जातात; पण या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे बस फुल्ल चार्जिंग न करताच मार्गावर सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना धाकधुकीतच पुणे - मुंबइ प्रवास करावा लागत आहे. याकडे एसटी प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल प्रवासी करत आहेत.

पुण्याहून पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत दादर, बोरिवली, ठाणे या मार्गावर अर्धाएक तासाला ई-शिवनेरी बससेवा आहे. या मार्गावर स्वारगेट येथून जवळपास ८८ आणि पुणे स्टेशन येथून दादरसाठी ३७ ई-शिवनेरी धावतात. पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांचा या आरामदायी बस प्रवासाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून स्वारगेट आणि पुणे स्टेशन भागात वीजपुरवठा खंडित होत असल्याने ई-शिवनेरी बसचे चार्जिंग पूर्ण क्षमतेने होण्यास अडचण होत आहे.

त्यामुळे दुपारनंतर बस चार्जिंग नसल्यामुळे बंद पडण्याची अथवा पुन्हा चार्जिंग करण्याची वेळ येत आहे. शिवाय प्रवासातच बसमध्ये चार्जिंग कमी आहे. बस बंद पडल्यानंतर उतरावे लागेल, असे चालकांकडून वारंवार सांगितले जाते. त्यामुळे पुरेशी चार्जिंग नसल्यास मार्गावर बसच सोडू नका, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.


वाहतूक कोंडी व विजेची समस्या

पुणे स्टेशन आणि स्वारगेट मुख्यालयात ई-शिवनेरी बस चार्जिंग केल्या जातात. पण, या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित होतो. त्याचा फटका चार्जिग करण्यावर होतो. शिवाय सकाळच्या टप्प्यात सोडण्यात आलेल्या ‘एक्स्प्रेस वे' होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बस पोहोचायला उशीर होतो. त्यामुळे दुपारनंतर परतीच्या वेळी बस वेळेवर दाखल न झाल्यामुळे पुढील नियोजनावर परिणाम होते. शिवाय बस पुण्यात दाखल झाल्यावर चार्जिंगसाठी दोन तास वेळ लागतो. यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहावी लागते.
 
बसची बदलाबदली 

दादर, बोरिवली आणि ठाणे मार्गावर सोडल्या जाणाऱ्या बस उशिरा दाखल झाल्यानंतर त्या दोन तास चार्जिंगला दुपारी लावल्या जातात. दादरला जाणारे प्रवासी जास्त असतील, तर बोरिवलीची ई-शिवनेरी त्या मार्गावर सोडली जाते. परिणामी बोरिवलीच्या बसला उशीर होतो, तर कधी-कधी ठाणे मार्गावरील बस बोरिवलीसाठी सोडली जाते. यामुळे एसटीचे वेळापत्रक बिघडत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Pune-Mumbai journey of E-Shivneri in Passengers are asking when the ST administration will pay attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.