Pune MNS: मनसेच्या वसंत मोरेंना हटवलं, पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:09 IST2022-04-07T14:09:00+5:302022-04-07T14:09:39+5:30
पुण्यातील मनसेचे नगरसेवक आणि पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समजते.

Pune MNS: मनसेच्या वसंत मोरेंना हटवलं, पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर
पुणे - गुढी पाडव्यानिमित्त मुंबईतील शिवतिर्थावर झालेल्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद राज्यभर आणि मनसेतही उमटले. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे काही मनसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यात, पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनीही अडचण झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर, आता पुणे शहराध्यक्षपदावरुन ते बाजूला झाले आहेत.
पुण्यातील मनसेचे नगरसेवक आणि पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समजते. कारण, मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ संभाजी बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साईनाथ हेही विद्यमान नगरसेवक आहेत. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/Egqw962ZIx
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 7, 2022
बाळा नांदगावकरांनी एकाच वाक्यात सांगितले
वसंत मोरे यांच्याविषयी राज ठाकरे ९ एप्रिलच्या सभेत स्वत:च बोलणार आहेत. आता आमचे सुप्रीमो यावर बोलणार असतील आम्ही त्यावर आता काही बोलणे योग्य ठरणार नाही, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तर पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या शिवतीर्थवर बोलवण्यात आलेल्या बैठकीविषयी बोलणे त्यांनी टाळले. मी ठाण्यात आलो आहे. त्यामुळे शिवतीर्थावरील बैठकीविषयी मला माहिती नाही, असे सांगत बाळा नांदगावकर यांनी याविषयावर बोलणे टाळल्याचे सांगितले जात आहे. तसेच बाळा नांदगावकर यांनी ठाण्यामध्ये सभेसाठी मोकळे मैदान नसल्याने सदर सभा रस्त्यावरच घ्यावी लागणार, असा इशारा दिला आहे. रस्त्यावर परवानगी मिळाली नाही तर रस्त्यावरच टेबल टाकून राज ठाकरे यांची सभा घेणार असेही यावेळी ते म्हणाले आहेत.