काल डुग्गू सापडल्याचा आनंद, आज कुटुंबावर शोककळा; स्वर्णवला भेटायला येणाऱ्या आत्याचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 12:05 IST2022-01-20T12:03:37+5:302022-01-20T12:05:43+5:30
अपघातात दोन लहान मुलं गंभीर जखमी.

काल डुग्गू सापडल्याचा आनंद, आज कुटुंबावर शोककळा; स्वर्णवला भेटायला येणाऱ्या आत्याचा अपघाती मृत्यू
पाषाण : पुण्यातील बालेवाडी परिसरातून पाच ते सहा दिवसांपूर्वी चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णव चव्हाण (swarnav chavan) या चिमुरड्याचं अपहरण झालं होतं. परंतु बुधवारी स्वर्णव आपल्या आईवडिलांकडे परतला. एकीकडे त्यांच्या मनात हा आनंद असतानाच दुसरीकडे कुटुंबायांवर शोककळा पसरली आहे. स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी पोचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच नांदेडहून आपल्या भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघाती मृत्यू झाला
सुनीता संतोष राठोड (वय ३६) यांचा नगर महामार्गावर चारचाकीच्या अपघातात मृत्यू झाला असून त्यांची दोन मुले व पती जखमी झाले आहेत. समर राठोड (वय १४), अमन राठोड (वय ६) अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून सुनीता राठोड यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी पुण्यात बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय व बाणेर परिसरात साजरा केला जात होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.