Pune Mini Lockdwon : संचारबंदीचा पुणेकरांनी घेतला धसका; मार्केटयार्डमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 15:06 IST2021-04-03T15:01:29+5:302021-04-03T15:06:43+5:30
Mini Lockdown : एकीकडे कोरोना रोखण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत असताना दुसरीकडे नागरिक खरेदीसाठी तोबा गर्दी करत आहे.

Pune Mini Lockdwon : संचारबंदीचा पुणेकरांनी घेतला धसका; मार्केटयार्डमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी
पुणे : पुण्यात आजपासून 'मिनी लॉकडाऊन'जाहिर करण्यात आला आहे. दुकानांना वेळा सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, एकीकडे कोरोना रोखण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत असताना नागरिकांकडून तोबा गर्दी केली जात असल्याचे चित्र मार्केटयार्ड परिसरात शनिवारी पाहायला मिळाले आहे.
पुण्यात उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पुण्यात कडक निर्बंध आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्बंधांची आजपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.त्याच धर्तीवर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पुणेकरांनी थेट मार्केटयार्ड गाठले. मात्र याचदरम्यान नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचे जाणवत होते. कारण किराणा भुसार बाजारात तोबा गर्दी जमा झाली होती.
खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी अस्ताव्यस्त पार्किंग केल्यामुळे काहीवेळ या भागात वाहतुककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती.
तसेच शहरातील किराणा दुकानांमध्ये देखील संचारबंदीमुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली असल्याचे निदर्शनास आले. कर्वेनगर, कोथरुड, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता,प्रमुख पेठांमध्ये, मंडई परिसरात देखील पुणेकरांची खरेदीसाठी एकच झुंबड उडालेली दिसली. जीवनावश्यक खरेदीसाठी येथे नागरिकांना तीन ते चार तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
नागरिकांसह व्यापाऱ्यांनी सुद्धा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क, सॅनिटायझर वापर देखील गरजेचा आहे.
.....
नेहमीपेक्षा गर्दी जास्त...पण सर्वतोपरी काळजी घेतोय...
शहरातील छोट्या छोट्या दुकानदार नागरिकांनी संचारबंदी, लॉकडाऊनचा चांगलाच धसका घेतलेला दिसतो आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा आज जास्त गर्दी आहे. बहुतेक आगामी काळात मालाचा तुटवडा जाणवू नये,म्हणून माल भरून ठेवण्याचे सर्वांचेच नियोजन आहे. परंतु आम्ही गर्दी केली असली तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे कठोर पालन करण्याबाबत आम्ही आग्रही आहोत.
प्रवीण चोरबोले, मार्केटयार्ड