Pune Mini Lockdown: State Government and Administration Order Unjust; In Pune, the merchant class took to the streets | Pune Mini Lockdown: राज्य सरकार आणि प्रशासनाचा आदेश आमच्यावर अन्यायकारक; पुण्यात व्यापारी वर्ग आक्रमक

Pune Mini Lockdown: राज्य सरकार आणि प्रशासनाचा आदेश आमच्यावर अन्यायकारक; पुण्यात व्यापारी वर्ग आक्रमक

पुणे : कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आक्रमक झाले असून कठोर पावले उचलत आहे.याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिका प्रशासन यांच्याद्वारे शहरात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी नाकारली आहे. याचाच निषेध म्हणून पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर विविध व्यापारी संघटनांनी प्रशासनाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.

पुण्यात मंगळवारी सकाळी लक्ष्मी रस्त्यावर अनेक व्यापारी राज्य सरकार व प्रशासनाच्या निषेध व्यक्त करणाऱ्या फलकांसह रस्त्यावर घोषणाबाजी केली. यावेळी अनेक व्यापारी वर्गाने गर्दी करत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणीही केली आहे.

याबाबत लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटनेचे प्रशांत टिकार म्हणाले,प्रशासनाचा हा निर्णय सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा आहे.आधीच अडचणीत सापडलेल्या व्यापारी वर्गाला या निर्णयामुळे खूप मोठा फटका बसणार आहे.सरकार व प्रशासनाने आमच्या भावनांचा व परिस्थितीचा विचार करावा. आम्हाला दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.

कोरोनावरून सरकारने जाहीर केलेल्या बंदचा लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्यांनी मंगळवारी सकाळी निषेध केला. सरकार अनावश्यक बंद घोषित करून दुकानदार व कामगारांच्या जगण्यावरच गदा आणत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.

पुना गेस्ट हाऊससमोरच्या पदपधावर सर्व दुकानदार जमा झाले. अनंत ड्रेसेस, पुनम सिलेक्शन, फँक्टरी कलेक्शन, शो मँन वगैरे दुकाने तसेच संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावरील कापड दुकांनांसह बाजारपेठ बंद होती. पदपथावर रांगेने ऊभे रहात व्यापारी व दुकानदारांनी बंदच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. काही हजार दुकाने व किमान लाखभर कर्मचारी यांची तर.सरकार दैना करत आहेच, शिवाय खरेदीची गरज असणाऱ्या नागरिकांनाही त्रास देत आहे अशी टीका करण्यात आली.

दरम्यान राज्य सरकार व महापालिका आयुक्त यांच्या दोन वेगवैगळ्या परिपत्रकांमुळे गोंधळ निर्माण झाला असल्याचे दिसते आहे. राज्य सरकारने किराणा औषधे वगैरे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद म्हटले आहे. महापालिका आयुक्तांच्या आधीच्या परिपत्रकात दुकाने खुली राहतील असे होते. रात्री उशिरा त्यांनी सरकारी परिपत्रकाची री ओढली. त्यामुळे नक्की काय असा गोंधळ झाला असल्याची चर्चा आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pune Mini Lockdown: State Government and Administration Order Unjust; In Pune, the merchant class took to the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.