Pune Metro : पुणेरी मेट्रोची म्हाळुंगे-बालेवाडीपर्यंत ‘ट्रायल रन’ यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 10:04 IST2025-08-28T10:04:42+5:302025-08-28T10:04:54+5:30
माण डेपोपासून ते म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलाजवळील स्टेशन क्रमांक १० पर्यंत ही चाचणी यशस्वी पार पडली.

Pune Metro : पुणेरी मेट्रोची म्हाळुंगे-बालेवाडीपर्यंत ‘ट्रायल रन’ यशस्वी
पुणे : माण-हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोने माण डेपो ते म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलापर्यंत गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बुधवारी ट्रायल रन यशस्वीपणे पूर्ण केली. यापूर्वी मेट्रोच्या एकूण तीन चाचण्या यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. त्या सर्व चाचण्या माण ते हिंजवडी हद्दीतच घेण्यात आल्या होत्या. बुधवारी पहिल्यांदाच हिंजवडी हद्दीबाहेर मेट्रोने धाव घेतली. माण डेपोपासून ते म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलाजवळील स्टेशन क्रमांक १० पर्यंत ही चाचणी यशस्वी पार पडली.
माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणारा एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या पुणे मेट्रो लाइन - ३ प्रकल्पाचे काम ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे पुणे शहर आणि आयटीनगरी जोडली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), टाटा आणि सिमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत विकसित केलेल्या आयटीनगरी मेट्रोचे काम सुरू आहे.
एकूण २३.३ किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरमध्ये २३ स्थानके असणार आहेत. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी जलद व सुरक्षित वाहतुकीसाठी मेट्रो महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकल्पासाठी चार आधुनिक मेट्रो ट्रेनचा सेट आला आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन पूर्णपणे वातानुकूलित डबे असून, त्याची एकूण प्रवासी क्षमता अंदाजे एक हजार आहे. माण डेपोपासून ते म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलाजवळील स्टेशन क्रमांक १० पर्यंत ही चाचणी यशस्वी चाचणी झाली. यावेळी मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ उपस्थित होते.