पुणे : महापालिकेच्या सभागृहाला एक परंपरा आहे. सभासदांशिवाय आणि महापालिकेचे अधिकारी व नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांशिवाय सभागृहात प्रवेश मिळत नाही. मात्र, महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी सभागृहात सोमवारी नगरसेवकांचे कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या रील तयार करण्यासाठी मोबाइल घेऊन थेट सभागृहात वावरत असल्याचे पाहायला मिळाले. या रील बहाद्दरांवर नियंत्रण मिळवण्याची मागणी अधिकारी व कर्मचारी बोलून दाखवत होते.
पुण्याचा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक सोमवारी महापालिकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे कोणताही जल्लोष न करता निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यात आली. मात्र, निवडणूक सुरू असताना रील तयार करणारे कार्यकर्ते सभागृहात वावरत होते. त्यांच्यावर कोणाचाही कंट्रोल पाहायला मिळाला नाही.
पुणे महापालिकेच्या सभागृहाची एक परंपरा आणि शिस्त आहे. महापालिका कर्मचारी आणि नगरसेवकांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना सभागृहामध्ये प्रवेश देण्यात येत नाही. असे असताना अनेक नगरसेवकांची समाजमाध्यमाचे काम पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी थेट सभागृहामध्ये प्रवेश केला. मोबाइलवर सभागृहातील संपूर्ण चित्रीकरण करण्यात येत होते. महापौर पदाची निवडणूक असल्यामुळे सुरक्षा विभागाकडून नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना पास देण्यात आले होते. असे असताना रील तयार करणारे कार्यकर्ते सभागृहात कोणाच्या परवाणगीने आले हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रचार करण्यात आला आहे. प्रत्येक उमेदवाराने या माध्यमाचा वापर केला. आता निवडणूका संपल्या आहेत. महापालिका सभागृहाला एक मान आणि शिस्त आहे. सभागृहात कोणाला कसाही वापर करता येत नाही. महापौरांची निवड झाल्यानंतर अनेक नगरसेवकांनी सभागृहातच फोटोग्राफी केली. त्यामुळे सभागृहाची शिस्त ही नवीन नगरसेवकांना प्रत्येक पक्षाकडून सांगणे आवश्यक आहे. दरम्यान, या प्रकारावर अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या पत्रकार गॅलरीमध्ये पत्रकारांना प्रवेशासाठी पास देण्यात आले होते. असे असताना पत्रकार गॅलरीमध्ये सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांचा वशिला लावून प्रवेश मिळवला. पत्रकार गॅलरीमधून रील आणि समाजमाध्यमामध्ये थेट प्रक्षेपण करण्यात आले. महापालिकेच्या सभागृहाचे पावित्र्य नवीन सभासदांनी पाळणे आवश्यक आहे. सुरक्षा विभागाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर सुरक्षा विभागाने अशा कार्यकर्त्यांना सभागृहाच्या बाहेरचा रस्ता दाखवला.
Web Summary : New Pune councilors broke rules during the mayoral election, allowing supporters with phones to film reels inside the hall. This raised concerns about security and maintaining decorum.
Web Summary : पुणे के पार्षदों ने महापौर चुनाव के दौरान नियमों का उल्लंघन किया, समर्थकों को हॉल के अंदर रील्स बनाने की अनुमति दी, जिससे सुरक्षा और मर्यादा पर सवाल उठे।