पुणे : “महापालिकेच्या महापौरपदाचा स्वीकार केल्यानंतर आतापर्यंत सर्वाधिक तक्रारी या शहरात अतिक्रमण वाढल्याच्या आल्या आहेत. या व इतर तक्रारींचे तातडीने निवारण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. सर्वाधिक तक्रारींची सोडवणूक करणाऱ्या विभागांचा सन्मान, तर तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाईदेखील केली जाईल,” अशी माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली.
महापालिकेच्या विविध कामांसह समस्यांबाबत महापौर मंजूषा नागपुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, आरोग्य सेवांमधील अडथळे यासह विविध समस्यांबाबत नागपुरे यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “महापौर कार्यालय व पीएमसी कार्यालयाकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रारींचा एकात्मिक विचार करून त्या सोडविल्या जातील. तक्रारींच्या सद्यःस्थितीबाबत मोबाइल ॲपवर माहिती मिळेल. शहरातील आमदारांकडेही येणाऱ्या तक्रारी महापालिकेकडे पाठवाव्यात, अशी विनंती मी त्यांना करणार आहे. शहरात अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. निवारण होईल, यावर आता भर दिला जाईल. त्याचबरोबर नागरिकांना तक्रारींची सद्यःस्थिती मोबाइल ॲपद्वारे पाहता येणार आहे.”
महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय वगळता अद्ययावत दर्जाचे रुग्णालय नाही. नव्याने रुग्णालये तयार करण्यापेक्षा महापालिकेचे पडून असलेले रुग्णालये अद्ययावत केले जातील. याबरोबरच अनेक दवाखाने, रुग्णालयांमध्ये स्वच्छता ठेवण्याबरोबरच तिथे अधिक चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभागाची बैठक घेतली, त्यामध्ये याबाबतच्या सूचना दिल्याचे महापौर नागपुरे यांनी सांगितले.