पुणे : महापालिकेतील प्रशासकीय राजवटीचा चार वर्षांचा कालावधी संपुष्टात येऊन महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीनिमित्ताने महापालिकेचे सभागृह सोमवारी पुन्हा फुलले. मात्र या सभागृहावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूचे सावट स्पष्टपणे दिसून येत होते. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक असल्यानंतर पाहायला मिळणारा जल्लोष, घोषणाबाजी कुठेही झाली नाही.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या सभागृहाची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली. त्यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला होता. प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त हे सर्वेसर्वा होते. चार वर्ष प्रशासक राज असलेल्या महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली आणि लोकनियुक्त नगरसेवकांची सत्ता महापालिकेवर आली. चार वर्षानंतर सोमवारी महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा होती. या सभेत महापौर व उपमहापौरांची निवड करण्यात आली. यानिमित्ताने महापालिकेचे सभागृह पुन्हा नगरसेवक, कर्मचारी व अधिकारी, कार्यकर्त्यांनी फुलले.
महापालिकेतील आजवरचा इतिहास पाहता नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर सर्व नगरसेवक फेटे बांधून घोषणाबाजी करत सभागृहात येत असतात. महापौर व उपमहापौर यांची निवड झाल्यानंतर हारतुरे, घोषणाबाजी, जल्लोष, ढोल-ताशांचा गजर करतात. मात्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सोमवारी झालेल्या महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत हे चित्र नव्हते. पहिल्या सभेवर आणि महापौर, उपमहापौरांच्या निवडीवर अजित पवार यांच्या निधनाचे स्पष्ट सावट दिसत होते. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या जाण्यामुळे शहराचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
Web Summary : Pune Municipal Corporation reconvened after four years, overshadowed by Ajit Pawar's demise. Celebrations were subdued as the city mourned his loss during the mayoral elections. A solemn atmosphere replaced the usual fanfare.
Web Summary : अजित पवार के निधन के शोक के बीच पुणे महानगरपालिका चार साल बाद फिर से शुरू हुई। महापौर चुनाव के दौरान शहर में शोक की लहर थी, जिसके कारण उत्सव कम हो गया। सामान्य धूमधाम के बजाय एक गंभीर माहौल था।