Pune Bridge Collapse: अहो, आमचा नातू कुठे आहे, कोणीतरी सांगा ना..!

By नारायण बडगुजर | Updated: June 16, 2025 14:15 IST2025-06-16T14:13:18+5:302025-06-16T14:15:12+5:30

Pune Maval Bridge Collapse: पुणे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पाच वर्षीय विहान याच्या आजीने हंबरडा फोडला.

pune maval bridge collapse News Grandmother grieves over grandson's death | Pune Bridge Collapse: अहो, आमचा नातू कुठे आहे, कोणीतरी सांगा ना..!

Pune Bridge Collapse: अहो, आमचा नातू कुठे आहे, कोणीतरी सांगा ना..!

नारायण बडगुजर,
लोकमत न्यूज नेटवर्क 

पुणे: अहो... आमचा नातू कुठे आहे, तो कसा आहे, कोणी तरी आम्हाला सांगा ना, कोणीच आम्हाला काही का सांगत नाहीत, असा प्रश्न विचारून मोहिनी कदम यांनी हंबरडा फोडला. शेलारवाडी येथील कुंडमळा साकव पूल दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले. त्यात मोहिनी यांची मुलगी सविता या देखील जखमी झाल्या.

मोहिनी कदम यांची मुलगी सविता ही पती रोहित माने आणि त्यांचा पाच वर्षीय मुलगा विहान यांच्यासोबत रविवारी कुंडमळा येथे आले होते. त्यावेळी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सविता गंभीर जखमी झाल्या. त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच मोहिनी कदम आणि त्यांचे पती संजय कदम यांनी कुंडमळा येथे धाव घेतली. मात्र, त्यांची मुलगी सविता, नातू विहान आणि जावई रोहित हे त्यांना दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांची चिंता वाढली.

संजय कदम म्हणाले, ‘‘आमची मुलगी, जावई आणि नातू हे आज इकडे फिरायला आले. मात्र, आता त्यांच्याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. माझी मुलगी सविता रुग्णालयात असल्याचे सांगण्यात येत आहे. आता आम्ही तिकडे जात आहोत.’’ माझे जावई फोनवर बोलत का नाहीत? मोहिनी कदम यांनी जावई रोहित माने यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 

पूल कोसळला, त्यावेळी पुलावर माझे वडील होते
इंद्रायणी नदीच्या छोट्या पुलावर माझे वडील गेले होते, त्यावेळी पर्यटकांची मोठी गर्दी झाली. नदीतील रांजणखळगे पाहण्यासाठी खूप पर्यटक आलेले होते. त्याचवेळी अचानक पूल कोसळला, त्यावेळी पुलावर माझे वडील होते. मी, माझी आई व बहीण आम्ही नदीपात्रातील खडकावर बसलेलो होतो, परंतु अचानक घटना घडल्याने मला काहीही करता आले नाही. पुलाचा मधला भाग वाहत्या पाण्यात पडला. मात्र, तेथे पोहोचणे शक्य नव्हते. माझे बाबा बचावले पाहिजेत. सुजित साठले, वानवडी, पुणे

मी पुलावरून पुढे गेलो अन् मोठा आवाज झाला
मी व माझा भाऊ अशोक भेगडे घरी जाताना नदीच्या पुलावरून जात होतो. गर्दीतून वाट काढत मी कसाबसा पुढे गेलो अन् मागे मोठा आवाज झाला. पाहतो तर मागे पूल कोसळला होता. काहीजण पुलाच्या लोखंडी सांगाड्यात अडकले होते. मोठा आक्रोश होत होता. माझा भाऊ अशोक भेगडे हादेखील मागे गर्दीत अडकला होता. आमचे नशीब बलवत्तर, देवाची कृपा म्हणून वाचू शकलो. गुलाब भेगडे, कुंडमळा, इंदोरी

Web Title: pune maval bridge collapse News Grandmother grieves over grandson's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.