Leopard Attack: रोहनचा मृतदेह १७ तास शववाहिनीत; वडिलांना अशक्तपणा, रुग्णालयात उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:50 IST2025-11-04T12:48:58+5:302025-11-04T12:50:32+5:30
Leopard Attack in Pune: रोहनचे वडील विलास बोंबे यांना अशक्तपणा आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Leopard Attack: रोहनचा मृतदेह १७ तास शववाहिनीत; वडिलांना अशक्तपणा, रुग्णालयात उपचार
मंचर : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रोहन विलास बोंबे (वय १३) याचा मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १७ तास शववाहिनीतील बर्फाच्या पेटीत ठेवण्यात आला होता.
नातेवाइकांनी बिबटे मारण्याची परवानगी व जिल्हाधिकारी-पालकमंत्री घटनास्थळी येण्याची अट घालून अंत्यसंस्कार थांबवल्याने ही स्थिती निर्माण झाली. रोहनचे वडील विलास बोंबे यांना अशक्तपणा आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.  रविवारी रात्री १२ वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणला. डॉ. तिरुपती मूलधीर यांनी पहाटे १ वाजता शवविच्छेदन केले. दोन महिन्यांपूर्वी मिळालेल्या नवीन शववाहिनीतील बर्फ पेटीत पहाटे ३ वाजता मृतदेह ठेवला. वडील, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळी गर्दी वाढल्याने एक पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, १० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे व प्रशांत ढोले यांनी रुग्णालयाला भेट दिली. रात्री उशिरापर्यंत शववाहिनी रुग्णालयाच्या पूर्वेला उभी होती.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी जाधव म्हणाले, ‘विलास बोंबे यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर आहे. नवीन शववाहिनीची गाइडलाइन अद्याप आलेली नाही. बर्फ पेटी २४ ते ४८ तास टिकते, तरी आंदोलन वाढल्याने चिंता होती.’