Trupti Kolte | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 14:04 IST2022-12-10T12:24:53+5:302022-12-10T14:04:24+5:30
पुणे : हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना निलंबित केले आहे. हडपसर येथील सर्व्हे नंबर ६२ ही राखीव वन या ...

Trupti Kolte | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित
पुणे : हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना निलंबित केले आहे. हडपसर येथील सर्व्हे नंबर ६२ ही राखीव वन या संवर्गातील जमीन अनाधिकाराने अर्जदाराला प्रदान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तत्कालीन महसूल मंत्री यांच्या आदेशाची खातरजमा न करता तसेच शासनाच्या पूर्व परवानगी न घेता व पुण्याचे जिल्हाधिकारी यांची आवश्यक असणारे मार्गदर्शन, अभिप्राय किंवा आदेश प्राप्त न करता कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन अर्जदारास १२जुले २०२१ रोजी ही जमीन नावावर करून दिली होती.
२३ मे २०२२ ला विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या अहवालावरून तहसीलदार तृप्ती कोलते यांनी कोरोना काळात जिवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना व आवश्यक सेवासुविधा प्राप्त करून घेताना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दि. ०१.१२.२०१६ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार विहीत कार्यपध्दतीचा अवलंब न करता वित्तीय अनियमितता केल्याचे निदर्शनास आले आहे.
तसेच, २ जून २०२२ च्या पत्रान्वये विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालावरून तहसीलदार तथा व्यवस्थापकीय अधिकारी तृप्ती कोलते यांनी प्रकाश व इतर यांच्या प्रकरणात नियमबाह्य पध्दतीने कामकाज केले असल्याचे दिसून आले आहे. या शिवाय कोलते यांच्याविरुद्ध निवडणूकविषयक कामकाजाच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारी या गंभीर स्वरुपाच्या असल्याचे निदर्शनास आलेले आहे. कोलते यांनी कामात केलेल्या अनियमितता या गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे कोलते यांना शासन सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुषंगाने तहसीलदार कोलते यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९ च्या नियम ४ (१) (अ) मधील तरतुदीनुसार या आदेशान्वये निलंबित करण्यात येत आहे. निलंबन कालावधीत तृप्ती कोलते यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे असेल व जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. असेही शासन आदेशात म्हंटले आहे.