Pune Ganpati Festival : यंदाची विक्रमी विसर्जन मिरवणूक; तब्बल ३४ तास ४४ मिनिटांनी विसर्जन सोहळ्याची सांगता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 20:53 IST2025-09-07T20:44:58+5:302025-09-07T20:53:24+5:30
- गेल्या तीन वर्षाच्या मिरवणुकीसह 2005 च्या मिरवणुकीच्या वेळेचे रेकॉर्ड मोडले

Pune Ganpati Festival : यंदाची विक्रमी विसर्जन मिरवणूक; तब्बल ३४ तास ४४ मिनिटांनी विसर्जन सोहळ्याची सांगता
पुणे : पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची सांगता ३४ तास ४४ मिनिटांनी झाली. मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच तास आधी होऊनही पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे विसर्जन मिरवणूक रेंगाळली. तब्बल सव्वा चार तास मिरवणूक संपण्यास विलंब लागला. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीने गेल्या तीन वर्षांच्या वेळेचे रेकॉर्ड मोडले आहे. ढोलताशा पथकांमधील सदस्य संख्येबाबत पोलिसांनी दाखविलेली शिथिलता, वादकांची संख्या नियंत्रण ठेवण्यात मंडळे व पोलिसांना आलेले अपयश, वादकांचा वादनासाठीचा आग्रह, डीजेचा दुसऱ्या दिवशीही सुरु असलेला दणदणाट, राजकीय दबावामुळे पोलिसांची हतबलता, शनिवार-रविवार सुट्टीचा दिवस असल्याने झालेली गर्दी कारणांमुळे मिरवणूक संपण्यास उशीर झाला.
पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह देश विदेशातील भाविकांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी (दि. ६) सकाळपासून सुरु झालेल्या गर्दीचा ओघ रविवारी (दि. ७) सायंकाळनंतरही कायम होता. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यावरून अनेक मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेत बाप्पांना वाजत गाजत निरोप दिला. रविवारी सकाळपासूनच खग्रास चंद्रग्रहणाचे वेध लागले. काही प्रतिष्ठित मंडळांनी वेध लागण्यापूर्वीच गणेशाचे विसर्जन करावे असे आवाहन इतर मंडळांना केले होते. मात्र, गणेश मंडळानी हे आवाहन जुमानले नाही. रविवारचा सुट्टीचा दिवस सार्थकी लावत मिरवणूक सोहळा सुरूच ठेवला. कार्यकर्त्यांनी सायंकाळनंतरही डीजे च्या तालावर नाचत गुलालाची उधळण करीत जल्लोष कायम ठेवला. गेल्या तीन वर्षाप्रमाणेच यंदाही विसर्जन मिरवणुकीने ३० तासांपेक्षा जास्त काळ मिरवणूक सुरु राहण्याची परंपरा कायम ठेवली. अमरज्योत मिञ मंडळ, काशेवाडी शेवटचा गणपती नटराज घाट येथे रात्री 8.15 मिनिटांनी विसर्जित झाला. विशेष म्हणजे, २००५ मध्ये ३३ तास २० मिनिटे पुण्याची विसर्जन मिरवणूक चालली होती. तो विक्रम् देखील यंदाच्या मिरवणुकीने मोडीत काढला.
सुरुवातीला पोलिसांनी मंडळाच्या बैठका घेत दरवर्षी लांबणारी विसर्जन मिरवणूक यंदा वेळेवर् संपविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी यंदा एक तास आधीच मंडई येथे टिळकांच्या पुतळ्याला हार घालून सकाळी ९. ३० वाजता मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मानाच्या गणपती मंडळांनी यंदा तीन तास आधीच मिरवणूक संपविण्याचा केलेला निर्धार काही प्रमाणात का होईना पूर्ण केला. यंदा अडीच तास आधी मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे 5 वाजून 10 मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले. गेल्या वर्षी केसरीवाडा गणपतीचे ७. ३० वाजता विसर्जन झाले होते. मात्र, यंदा दीड तास आधी मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा समाप्त होऊनही सार्वजनिक मम्डळांच्या गणपतींचे विसर्जन होण्यास विलंबच लागला. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे भाविकांचा उत्साह अधिकच वाढला होता.
लहान मुले, महिला, तरुण-तरुणी यांची मिरवणुकीतील संख्या लक्षणीय होती. बेलबाग चौकासह कुमठेकर , टिळक चौकात वाढलेल्या गर्दीमुळे काही प्रमाणात धक्काबुक्की झाली. गेल्या दोन वर्षांपासून दगडूशेठ मंडळाचा गणपती चारच्या ठोक्याला बेलबाग चौकात हजेरी लावत आहे. मात्र, यंदा ही वेळ यंदा चुकली. बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरून जाणा-या मंडळांमध्ये कुमठेकर रस्त्यावरील शगुन चौकातून यंदा काही मंडळे मध्येच शिरल्याने मिरवणुकीला विलंब होण्यास सुरुवात झाली. येथूनच पोलिसांचे मिरवणुकीवरील नियंत्रण सुटत गेले आणि सर्व मिरवणूक पोलिसांच्या हाताबाहेर गेल्याचे दिसून आले. टिळक चौकात दगडूशेठ गणपतीचे आगमन झाल्यावर अभूतपूर्व गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
विसर्जन मिरवणूक किती तास चालली
वर्ष ----------------------- तास
२०२२ ------------------- ३०
२०२३ ------------------- ३१
२०२४ ------------------ ३० तास २७ मिनिटे
२०२५...........................३४ तास ४४ मिनिटे