Pune Ganpati Festival : मानाचे अन् प्रतिष्ठित मंडळांचे देखावे वेधताहेत पुणेकरांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 09:39 IST2025-08-29T09:38:57+5:302025-08-29T09:39:16+5:30
बाप्पाच्या दर्शनासाठी नागरिक बाहेर पडल्याने शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्येही सायंकाळनंतर झाली गर्दी; वरुणराजाच्या आगमनाने भाविकांची तारांबळ

Pune Ganpati Festival : मानाचे अन् प्रतिष्ठित मंडळांचे देखावे वेधताहेत पुणेकरांचे लक्ष
पुणे: लाडक्या बाप्पाच्या आगमनाने शहरात चैतन्य संचारले असून, अवधी पुण्यनगरी 'गणेशमय' झाली आहे. गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (दि. २८) भाविक वाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडल्याने शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्येही सायंकाळनंतर गर्दी पाहायला मिळाली.
याचवेळी रात्री वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांनी भरपावसातही देखावे पाहण्याचा आनंद लुटला. बहुतांश मंडळांचे देखावे सुरू झाल्यामुळे पुणेकर मंडळासमोर दुचाकी थांबवून देखाव्यांचा आस्वाद घे आहेत तर काही मंडळांच्या कार्यकर्त्यांची देखावे पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू असल्याचे दिसून आले. यंदाच्या गणेशोत्सवात पौराणिक हलत्या, जिवंत देखाव्यांसह पर्यावरणाचा संदेश देणारे देखावे लक्षवेधी ठरत आहेत.पुण्याच्या गणेशोत्सवाचा जगभरात लौकिक असल्याने पुण्याबाहेरील अनेक ठिकाणांहून भाविक मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसह, मंडई, भाऊ रंगारी गणेशाच्या दर्शनासाठी नागरिक येतात. विशेषतः आकर्षक आणि विविध विषयांवरील देखावे गणेशोत्सवाचे वैशिष्ट्ये असल्याने खास देखाव्यांचा अनुभव घेण्यासाठी भाविक येत आहेत.
गुरुजी तालीम मंडळाचे ज्योतिलिंग लक्षवेधी
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाने यंदा वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. नगरचे सजावटकार शुभंकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फायबर ग्लासमध्ये बारा ज्योतिर्लिंगांमधील एक सर्वात पचित्र असे ज्योतिलिंग बाराणसीचे श्री काशी विश्वनाथ मंदिर मंडळाने साकारले आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण श्यामसिंग परदेशी आहेत.
'वृंदावन'चा देखावा भाविकांचे आकर्षण
तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वृंदावन देखाव्याची प्रतिकृती पुणेकरांचे लक्ष वेधत आहे. तुळशीबागने मथुरेतील 'वृंदावन' हा तब्बल ८० फूट रुंद, १२० फूट लांब आणि ३५ फूट उंच असा भव्य देखावा साकारला. देखाव्यात १४ फूट उंचीचे ४० खांब, दहा बाय दहा आकाराचे १४ पॅनल आणि सुमारे ३० मोर वृंदावनात विहार करताना दिसतात. राधाकृष्णांचे मंदिर आणि २० फूट लांब, ४० फूट उंच भव्य प्रवेशद्वार या देखाव्याचे प्रमुख आकर्षण आहे. मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम आहेत.
'कृष्णकुंज' मध्ये विराजमान झालेले शारदा गजानन
अखिल मंडई मंडळाने 'कृष्णकुंज' ही आकर्षक सजावट केली आहे. हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती विराजमान झाले आहेत. श्री राधाकृष्णाच्या हस्तचित्रित मनमोहक कलाकृती विशेष आकर्षण आहेत. राजस्थानी शैलीतील ही सजावट असून, प्रवेशद्वारावर झोपाळ्यावरील राधाकृष्ण मूर्ती आहे. महिरप आणि मोरांच्या कलाकृती, कलमकारी शैलीतील श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित मोठी चित्रे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अध्यक्ष अण्णा थोरात, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते आहेत.
दगडूशेठने साकारले श्री पद्मनाभ स्वामी मंदिर
केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाते. या मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपूर आहे. कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारले आहेत. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती आहे. मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र ऊर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आहेत.