Pune Ganpati Festival : उत्सुकतेने जमलेल्या रसिकांचा हिरमोड; कलावंत पथकाला थांबवावे लागले वादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:24 IST2025-09-07T15:58:45+5:302025-09-07T16:24:37+5:30
प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने पारंपरिक वादन ऐकण्यासाठी व पथकाची ऊर्जा अनुभवण्यासाठी थांबले होते

Pune Ganpati Festival : उत्सुकतेने जमलेल्या रसिकांचा हिरमोड; कलावंत पथकाला थांबवावे लागले वादन
पुणे : सायंकाळी चारच्या सुमारास स्वारगेट येथे मार्केट यार्ड येथील श्री छत्रपती शिवाजी गणेश मंडळ दाखल होते. कलावंत ढोल-ताशा पथकातील सर्व वादकही ६ वाजता मिरवणुकीला सुरुवात करायची म्हणून तयारीत होते, मात्र एकाच जागी ४ ते ५ तास मंडळ असल्याने त्याचप्रमाणे डीजेसमोरील वाढणाऱ्या गर्दीमुळे कलावंत ढोल-ताशा पथकाला वादन करता आले, त्यांनी केवळ कल्लोळ करून वादनाची सांगता केली. त्यामुळे कलावंत ढोल-ताशा पथकाला उत्सुकतेने पाहण्यासाठी आलेल्या रसिकांचा हिरमोड झाला.
गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत नेहमीप्रमाणे उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळाला. मात्र यंदा मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आमंत्रित केलेल्या कलावंत पथकाला मोठा हिरमोड सहन करावा लागला. मंडळाच्या आमंत्रणानुसार संपूर्ण पथक संध्याकाळी ६ वाजता टिळकरोडवर तयार होते. मात्र मिरवणुकी दरम्यान डीजेच्या प्रचंड दणदणाटामुळे आणि गर्दीमुळे मिरवणूक एक इंचही पुढे सरकली नाही. मंडळाच्या प्रयत्नानंतरही परिस्थितीवर काहीही तोडगा निघू शकला नाही. परिणामी मंडळ आणि पथकाने निर्णय घेत ज्या ठिकाणी पथक उभे होते, तेथेच पारंपरिक गजर करून, ध्वजवंदन करत वादनास अनपेक्षितरीत्या विराम देण्याचा निर्णय घेतला.
या घटनेमुळे पथकाच्या कलाविष्काराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेकडो चाहत्यांचा हिरमोड झाला. प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने पारंपरिक वादन ऐकण्यासाठी व पथकाची ऊर्जा अनुभवण्यासाठी थांबले होते; परंतु डीजेच्या प्रचंड आवाजाने व वातावरणातील गोंगाटाने त्यांची निराशा झाली. गेल्या काही वर्षांपासून डीजे संस्कृतीमुळे पारंपरिक वादनाला मिळणारा वाव कमी होत चालल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
कलावंत पथकाला मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी आमंत्रित केलं. त्याप्रमाणे पूर्ण पथक ठरल्या वेळी सायंकाळी ६ वाजता वादनासाठी तयार असूनही टिळकरोडवरील विसर्जन मिरवणूक डीजेच्या भयानक धुमाकुळीत एक इंचही पुढे न सरकल्याने ठीक रात्री ९ वाजता असलेल्या जागी एक गजर करून, ध्वजवंदन करून वादनास विराम द्यावा लागला. उत्सुकतेने पारंपरिक वाद्य वादन पहावयास आलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला. - सौरभ गोखले, कलावंत ढोल-ताशा पथक
कलावंत पथकाला आमंत्रित केलं होत एकाच जागी मंडळ असल्याने त्यांना वादन करण्यासाठी संधी मिळाली नाही. तसेच पोलिस प्रशासनांनी आम्हाला टिळक रस्त्याला लागल्यावर दोन तासांत टिळक चौक गाठण्याचे उद्दिष्ट दिले होते मात्र एकाच जागी असल्यामुळे कलावंत पथकाला वादन करता आले नाही आणि परिणामी वादनाला विराम दिला. तसेच यावेळी पोलिस प्रशासनाचे नियोजन शून्य असल्याचेदेखील दिसून आले. - गणेश घुले, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी गणेश मंडळ