राजकारण्यांच्या वरदहस्ताने शहरात उत्सवाला उधाण;प्रतिष्ठापनेलाही पुढारी; मंडप, कमानींवर झळकू लागली छबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:40 IST2025-08-27T18:39:24+5:302025-08-27T18:40:30+5:30
या सागराला राजकारणी व्यक्ती, भावी इच्छुकांच्या वरदहस्ताने पहिल्या दिवसापासूनच उधाण आले आहे. लहानमोठ्या मंडळांमधील मुर्तींची प्रतिष्ठापना परिसरातील पुढाऱ्यांच्या हस्ते झाली

राजकारण्यांच्या वरदहस्ताने शहरात उत्सवाला उधाण;प्रतिष्ठापनेलाही पुढारी; मंडप, कमानींवर झळकू लागली छबी
पुणे: गणेशोत्सव म्हणजे चैतन्य, उत्साह यांचा जणू उसळता सागरच. या सागराला राजकारणी व्यक्ती, भावी इच्छुकांच्या वरदहस्ताने पहिल्या दिवसापासूनच उधाण आले आहे. लहानमोठ्या मंडळांमधील मुर्तींची प्रतिष्ठापना परिसरातील पुढाऱ्यांच्या हस्ते झाली. मंडप, कमानी यावर महापालिकेला इच्छुक असणाऱ्यांच्या छबी झळकत आहेत.
शहराचे माजी महापौर असलेले केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे कोथरूडमधील श्री साई मित्र मंडळ यंदा मोठ्याच उत्साहात आहेत. मंडळाचे सर्वेसर्वा असलेल्या मोहोळ यांना खासदारकीच्या पहिल्याच खेळीत थेट केंद्रीय राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली, त्यामुळे हा उत्साह आहे. मंडळाचे यंदा वेरूळ येथील कैलास मंदिराच्या लेण्याचा देखावा केला आहे. त्याशिवाय सलग पाचव्या वेळी आमदार झाल्यामुळे राज्यमंत्रीपदाची संधी मिळालेल्या माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत यंदा प्रसिद्ध दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना झाली. त्यांनीही अनेक मंडळाचा उदार आश्रय दिला आहे.
शहरातील या प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांशिवाय अन्य मंडळांवरही स्थानिक पदाधिकारी, पुढारी, महापालिकेचे इच्छुक यांची प्रेमळ छाया पडलेली दिसत आहे. त्यामुळे या मंडळांचे परिसरातील महत्वही वाढले आहे. त्यांचे देखावे भव्य तसेच झगमगाटही अतिशय भव्य आहे. मंडळाच्या मंडपावर, परिसरात लावलेल्या सजावटीच्या कमानींवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच या उदार आश्रयदात्यांच्या छबीही झळकत आहेत. एरवी वाढदिवसाच्या निमित्ताने चौकांमध्ये लागणाऱ्या भल्या मोठ्या फ्लेक्सवर गणेशोत्सवात मात्र आलेल्या सर्व गणेशभक्तांचे अमुकअमुक च्या वतीने सहर्ष स्वागत असा मजकूर लागलेला दिसतो.
महापालिका निवडणुकीचा थेट परिणाम उत्सवावर झालेला दिसतो आहे. त्यातही महापालिकेच्या विसर्जीत सभागृहातील ३ वर्षांपूर्वीचे माजी नगरसेवक जास्त जोरात दिसत आहेत. सलग ३ वर्षे महापालिकेची निवडणूक झालेली नाही, त्यामुळेच की काय आपण मतदारांच्या विस्मरणात गेले असलो पाहिजेत या भीतीने बहुतेकांनी आपापल्या भागातील लहानमोठ्या अशा सर्वच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना जवळ केलेले दिसते आहे. त्याशिवाय नव्याने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनाही मंडळाच्या माध्यमातून मतदारांच्या मनात शिरण्याचा प्रयत्न केलेला काही मंडळांमधून दिसतो. त्यांची मंडळातील दररोजची उपस्थिती तेच सांगते आहे.
राजकारण्यांच्या या सक्रिय व अर्थपूर्ण सहभागामुळे सगळे शहरच उत्सवात न्हाऊन निघाले आहे. प्रत्येक चौक सजला आहे, प्रत्येकच रस्त्यावर विद्यूत रोषणाई आहे. एकापेक्षा जास्त राजकारण्यांची मदत घेणारीही मंडळे आहेत. त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे ते कौशल्यच असते. कोणालाही नाराज करायचे नाही अशा विचाराने ते वेगवेगळ्या पक्षांच्या राजकारणी पदाधिकाऱ्यांना व्यवस्थित सांभाळतात.
काही रस्त्यांवर तर एकापाठोपाठ एक अशी सलग तीनतीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असतात. प्रामुख्याने शहराच्या मध्यभागात गुरूवार पेठ, रविवार पेठ, सराफ बाजार, मंगळवार, बुधवार, शनिवार पेठांमध्ये ही स्थिती आहे. ही सर्वच मंडळे जुनी आहेत, प्रत्येकाला त्याचात्याचा असा इतिहास आहे व प्रत्येकाचे कार्यकर्ते त्या इतिहासाशी प्रामाणिक आहेत. तो त्यांनी अस्मितेचा विषय केलेला असतो. अशी मंडळे सहसा राजकारणी आश्रय नाकारतात व स्वतंत्रपणे काम करतात. अशीही अनेक मंडळे शहरात आहेत.