Pune Ganpati Festival : शहरातील महत्त्वाच्या गणेश मंडळांचे जिओ मॅपिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 11:00 IST2025-08-30T10:59:10+5:302025-08-30T11:00:23+5:30
गणेशोत्सव राज्यासह देश-विदेशातील गणेशभक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गणेशभक्त येतात.

Pune Ganpati Festival : शहरातील महत्त्वाच्या गणेश मंडळांचे जिओ मॅपिंग
पुणे : शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख गणेश मंडळांसह उपनगरातील महत्त्वाच्या मंडळांचे जिओ मॅपिंग करण्यात आले आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना मंडळांची माहिती आणि ठावठिकाणा त्वरित उपलब्ध होऊन सुरक्षेसंदर्भात तत्काळ प्रतिसाद व मदत करणे शक्य होणार आहे.
गणेशोत्सव राज्यासह देश-विदेशातील गणेशभक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गणेशभक्त येतात. शहरातील मध्यवर्ती भागातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरी वाडा या मानाच्या पाच गणपतींसह अखिल मंडई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, बाबू, गेणू या गणपतींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. त्याचबरोबर उपनगरातील नामांकित मंडळेही भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात. त्यामुळे पुणे पोलिसांनी यंदा सर्व महत्त्वाच्या मंडळांना जिओ मॅपिंगच्या माध्यमातून सुरक्षा कवच दिले आहे.
पोलिसांना 'डिजिटल हजेरी'
पोलिसांना दररोजची 'डिजिटल हजेरी' अनिवार्य झाली आहे. म्हणजे पोलिसांनी प्रत्यक्ष मंडळाला भेट दिली की त्याची नोंद ऑनलाइन प्रणालीमध्ये होणार आहे. यामुळे जबाबदारी अधिक पारदर्शक राहील, तसेच मंडळांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांची गर्दी, मिरवणुका तसेच रात्री उशिरापर्यंत चालणारे कार्यक्रम लक्षात घेता पोलिसांनी घेतलेली ही तांत्रिक मदत मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरू शकते.
महिलांची सुरक्षा
गणेशोत्सवात १० व्या दिवसापर्यंत दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. या काळात गर्दीच्या व्यवस्थापनासाठी करण्यात आले आहे. जिथे जास्त गर्दी, तिथे जास्त बंदोबस्त तर कमी गर्दी असलेल्या ठिकाणीही बंदोबस्त नेमलेला प्रत्येक मंडळ व चौकनिहाय नियोजन आहे. या शिवाय महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही योजना आखण्यात आल्या आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.