Pune Ganpati Festival : दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 10:49 IST2025-08-28T10:48:09+5:302025-08-28T10:49:01+5:30
विसर्जन घाटावरील हौदांच्या रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे.

Pune Ganpati Festival : दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज
पुणे : पुण्याच्या वैभवशाली गणोशोत्सवाला दिमाखात सुरुवात झाली आहे. दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. विसर्जन घाटावरील हौदांच्या रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे. विसर्जन घाटावर महापालिकेचे कर्मचारी, जीवरक्षक, सफाई कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरात अनेक घरी दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते.
या गणरायांना गुरुवारी (दि.२८) निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी अमृतेश्वर घाट, पुलाची वाडी, नटराज सिनेमाजवळ, ओंकारेश्वर, वृद्धेश्वर, गरवारे महाविद्यालय, पांचाळेश्वर, अष्टभुजा मंदिर, संगम घाट, विठ्ठल मंदिर, बाप्पू घाट, ठोसर पागा घाट, चिमा उद्यान येरवडा, वारजे (स्मशानभूमी), दत्तवाडी घाट या घाटांवर सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडात करणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेकडून गणेश विसर्जनासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ३८ कृत्रिम हौद, एकूण २८१ ठिकाणी ठेवलेल्या ६४८ लोखंडी टाक्यांमध्ये सोय केली आहे. तसेच ३३८ ठिकाणी निर्माल्य कलश-कंटेनर ठेवण्यात आले आहेत. गणेशमूर्ती संकलनासाठी शहराच्या विविध भागांत २४१ मूर्तीदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले. पालिकेच्या वतीने नदीकाठी नेमण्यात आलेल्या जीवरक्षक सेवकांकडून शक्यतो गणेशमूर्तींचे विसर्जन करवून घ्यावे. प्रत्येक गणेश विसर्जन घाटावर अग्रिशमन दलाचा १ फायरमन असे एकूण १५ फायरमन सेवक आणि तिन्ही पाळ्यांमध्ये प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण १५ घाटांकरिता रोजंदारीवरील एकूण ९० जीवरक्षक, मध्यवर्ती अग्निशमन केंद्र येथे ३० राखीव जीवरक्षकांची गणेशोत्सव काळात तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे.
३४४ सीसीटीव्ही कॅमेरे
शहरामध्ये एकूण ४२९ विसर्जन घाट व हौद असून, सदर ठिकाणी ३७०८ एलइडी दिवे, १९७ जनरेटर सेट, ३८८ स्पीकर सेट, १९२ चौ.फूट एलइडी स्क्रीन बनविण्याची कामे करण्यास सुरवात झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील विसर्जन घाट व हौदांवर एकूण ३४४ तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली आहे.