गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...! भक्तीमय वातावरणात 'दगडूशेठ' गणपतीची भव्य रथातून थाटात आगमन मिरवणूकीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 12:04 IST2025-08-27T12:03:29+5:302025-08-27T12:04:24+5:30

- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; श्रीमध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना

Pune Ganpati Festival Ganpati Bappa Morya Auspicious image of Morya The grand arrival procession of 'Dagdusheth' Ganpati in a grand chariot begins in a devotional atmosphere. | गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...! भक्तीमय वातावरणात 'दगडूशेठ' गणपतीची भव्य रथातून थाटात आगमन मिरवणूकीला सुरुवात

गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...! भक्तीमय वातावरणात 'दगडूशेठ' गणपतीची भव्य रथातून थाटात आगमन मिरवणूकीला सुरुवात

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... च्या जयघोषात फुलांनी सजविलेल्या रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या जय गणेश प्रांगण येथे साकारलेल्या प्रतिकृतीमध्ये 'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला.

गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराजयांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, तुषार रायकर, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, विनायक रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक फुलांची सजावट आणि रथावर भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती लावण्यात आली होती. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक आली. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता.

ॠषिपंचमीनिमित्त ३५ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

गुरुवार, दिनांक २८ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३५ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर यांसह अनेक उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते १२ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. उत्सवांतर्गत सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री हे गणेशयाग आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. भाविकांना स्वहस्ते अभिषेक पहाटे ५ ते सायंकाळी ५ यावेळेत मंडपात करता येणार आहेत. 

Web Title: Pune Ganpati Festival Ganpati Bappa Morya Auspicious image of Morya The grand arrival procession of 'Dagdusheth' Ganpati in a grand chariot begins in a devotional atmosphere.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.