Pune Ganpati Festival : गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरलेले चार युवक बुडाले; दोघांचा मृत, दोन जणांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 21:27 IST2025-09-06T21:27:05+5:302025-09-06T21:27:39+5:30
या दुःखद घटनेने चाकण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune Ganpati Festival : गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरलेले चार युवक बुडाले; दोघांचा मृत, दोन जणांचा शोध सुरू
चाकण : वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव येथील भामा नदीत आणि बिरदवडी (ता. खेड) येथील विहिरीत गणपती विसर्जनादरम्यान चार युवक पाण्यात बुडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यातील दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांचा शोध घेतला जात आहे. या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वाकी बुद्रुक येथील प्रियदर्शन शाळेजवळील भामा नदीमध्ये अभिषेक संजय भाकरे (वय २१ वर्षे, रा. कोयाळी, ता. खेड) आणि आनंद जयस्वाल (वय २८ वर्षे, रा. उत्तरप्रदेश) हे दोघे गणपती विसर्जनादरम्यान पाण्यात बुडाले आहेत. या घटनेतील आनंद जयस्वाल याचा मृतदेह सापडला आहे, परंतु अभिषेक भाकरे याचा चाकण पोलीस, एनडीआरएफ टीम, अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून शोध सुरू आहे.
तसेच शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भामा नदीत गणेश विसर्जन करताना रवींद्र वासुदेव चौधरी (वय ४५ वर्षे, रा. शेलपिंपळगाव) हे नदीत गणपती विसर्जन करण्यासाठी गेले असता ते नदीत वाहून गेल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे.
बिरदवडी (ता. खेड) येथील संदेश पोपट निकम (वय ३५ वर्षे, रा. बिरदवडी) यांचा गणेश विसर्जन करताना तोल गेल्यामुळे बुडून मृत्यू झाला आहे. चाकण पोलीस, एनडीआरएफ टीम, अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
आज संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणच्या विहिरी, तलाव, नद्या याठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. चाकण परिसरात गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यूची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे, तर दोन जण पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांकडून आवाहन करूनही अनेकजण नदीपात्रात
भामा नदीसह परिसरातील तलाव, तळी आणि विहिरीत गणपती विसर्जन करताना उतरू नये, असे आवाहन चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून करण्यात आले आहे. परंतु तरीही काही जणांकडून नदीपात्रात जाऊन विसर्जन करण्याचे धाडस केले जात आहे. नदीत उतरून गणेश विसर्जन करण्याचे हे धाडस दोन जणांच्या जिवावर बेतले आहे.