Pune Ganpati Festival :केळकर रस्त्यावर डीजेची धूम, तरुणाई मनसोक्त थिरकली; रात्री १२ पर्यंत केवळ १५ गणपती मंडळाचे विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:50 IST2025-09-07T16:49:27+5:302025-09-07T16:50:29+5:30
केळकर रस्त्यावरील रात्री १२.०० नंतर अलका चौकातून विसर्जनासाठी मार्गस्थ झालेली प्रमुख मंडळे

Pune Ganpati Festival :केळकर रस्त्यावर डीजेची धूम, तरुणाई मनसोक्त थिरकली; रात्री १२ पर्यंत केवळ १५ गणपती मंडळाचे विसर्जन
पुणे : अनंत चतुर्थदशीच्या निमित्ताने शनिवारी व रविवारी पुण्यातील केळकर रस्त्यावर गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पडल्या. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरासोबतच डीजेच्या तालावर तरुणाईने मनसोक्त नृत्य केले. “सपने में मिलती है कुडी...”, “वाट बघतोय रिक्षावाला...”, “झालं झिंग...झिंग ..”, “मुंगळा...” यांसह जूनी हिंदी गाणी, रिमिक्स व पंजाबी गाण्यांवर युवक-युवती तुफान थिरकले.
केळकर रस्त्यावरून दुपारी १२.३० वाजता पहिला गणपती अलका टॉकीज चौकातून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. मात्र त्यानंतर संथ गतीने मिरवणूका सुरू होत्या. भोलैनाथ मित्र मंडळाचा (केळकर रोडचा राजा) गणपती नारायण पेठेकडून भिडे पूल चौकाकडे रात्री ११.४५ वाजता पोहोचला. केळकर रस्त्यावरून रात्री १.२० वाजेपर्यंत केवळ १५ गणपती मंडळेच अलका चौकात पोहोचली. दोन मंडळांमध्ये १०० ते १५० मीटर अंतर असल्याने मिरवणुका संथगतीने सरकत होत्या. रात्री ११.०० च्या सुमारास विश्व ज्योत मित्र मंडळ ट्रस्टने सुभाष मंडळ, भारत हायस्कूल हात्तीचौक मंडळाला पुढे जाण्यासाठी जागा करून दिली.
यावेळी ढोल-ताशा पथक व डिझेवरील ढोल-ताशाच्या जुगलबंदीवर वातावरण रंगले. डीजेवर वाजण्यावर गाण्यांवर अनेकदा वन्स मोरची मागणी करत तरूणाई एकाच जागेवर थबकून राहत होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून वारेवार आवाहन करूनही तरूणाईच्या उत्सहासमोर त्यांच्याही नाईलाज होत होता. डीजे, ढोल-ताशा, पारंपरिक वादन आणि तरुणाईचा उत्साह अशा संगमाने केळकर रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणुका अविस्मरणीय ठरल्या.
डीजेची मजा आणि पोलिसांचा हस्तक्षेप
डीजेवर ३०-३० मिनिटे एकाच ठिकाणी न थांबता गाणी वाजवली जात होती. ‘वन्स मोअर’च्या आरोळ्यांवर तरुणाईनं वारंवार गाण्यांची मागणी केली. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय.... आणि संभाजी महाराज की जय...च्या घोषणांनी रस्ते दणाणून गेले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षे केल्यानंतर मिरवणुका पुढे मार्गस्थ झाल्या.
कामत काकांचा डान्स चर्चेत
दरवर्षीप्रमाणे यंदाही भोलैनाथ मित्र मंडळाच्या डीजेसोबत वयाने ज्येष्ठ असलेले कामत काका नृत्य करताना दिसले. त्यांचा डान्स तरुणांमध्ये उत्साहाचे केंद्रबिंदू ठरला.
पोलीस आयुक्तांचे आवाहन आणि डीजे बंद
पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केळकर रस्त्यावर रात्री १२ नंतर डीजे वादन थांबवण्यात आले. त्यानंतर विसर्जन मिरवणुका अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या.
केळकर रस्त्यावरील रात्री १२.०० नंतर अलका चौकातून विसर्जनासाठी मार्गस्थ झालेली प्रमुख मंडळे
कुंजीर तालीम उंबऱ्या गणपती मित्र मंडळ – रात्री १२.४५ वा.
मुठेश्वर मित्र मंडळ – रात्री १२.४९ वा.
आदर्श मित्र मंडळ – रात्री १२.५४ वा.
वरद विनायक रथावरील श्रीराम अभिमन्यु मंडळ ट्रस्ट – रात्री १.१५ वा.
भारत माता मित्र मंडळ ट्रस्ट – पहाटे ३.२५ वा.