बाप्पा आले घरा, घेऊनी चैतन्याचा सोहळा;'विघ्नहर्ता'गणेशाच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 11:42 IST2025-08-27T11:41:19+5:302025-08-27T11:42:40+5:30
लाडक्या बाप्पांच्या मूर्तीचे आगमन घराघरांत झाले असून घरातील लहान-मोठ्या मंडळांनी बाप्पाची स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

बाप्पा आले घरा, घेऊनी चैतन्याचा सोहळा;'विघ्नहर्ता'गणेशाच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज
पुणे : 'आम्हा घरी तुम्ही, देवा गणराज यावे, मांडवी राहावे, दहा दिस!' या भावनेतून 'विघ्नहर्ता' गणेशाच्या स्वागतासाठी अवधी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. सुख, शांती अन् चैतन्याची उधळण करत भाद्रपदातल्या शुद्ध चतुर्थीला आज (बुधवारी) बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे. लाडक्या बाप्पांच्या मूर्तीचे आगमन घराघरांत झाले असून घरातील लहान-मोठ्या मंडळांनी बाप्पाची स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
श्रीगणरायांची मूर्ती घरी आणताना लहानग्यांसह ज्येष्ठापर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शहरातील पेठा, गल्लीबोळ, चौक, मोठे रस्ते यांसह उपनगरांमध्येही सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पूजेसह सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी पुणेकरांची बाजारपेठेत मंगळवारी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करत गणराय आज घरी येणार आहेत. यासाठी ढोल-ताशांच्या गजरात अन् 'गणपती बाप्पा मोरया'च्या जल्लोषात पुण्यनगरीमध्ये दिमाखात आगमन होत आहे. यंदा अकरा दिवसांचा गणेशोत्सव असल्याने पुढील अकरा दिवस आनंद आणि उत्साहाचा जणू सळसळता झराच पुण्यनगरीत वाहणार आहे. हाच उत्साह प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला शहरात पाहायला मिळाला. मानाच्या गणपर्तीच्या आगमन मिरवणुकीच्या कामात कार्यकर्ते व्यस्त होते तर देखावे वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची लगीनघाई सुरू होती. घराघरातही लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी महिला वर्गाची गडबड सुरू होती. दहा दिवस कोणता नैवेद्य करायचा याच्या चर्चा घराघरात ऐकायला मिळत होत्या.
लाडक्या बाप्पासाठी डेकोरेशन, फुलांची सजावट करण्यामध्ये लहान मुले गुंतली होती. नोकरदार महिलांची पावलेही कार्यालय सुटल्यावर गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळली होती. श्रीगणेशाची घरगुती प्रतिष्ठापना करण्यासाठी पारंपरिक वेशभूषेत भाविक मूर्ती घरी घेऊन जाताना दिसत होते. शहरात सर्वत्र चैतन्य संचारल्याचे चित्र होते.
४ हजार मंडळे करणार गणरायाचे स्वागत
शहरातील साडेतीन ते चार हजार अधिकृत मंडळे गणरायाचे स्वागत करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. मानाचे गणपती व इतर मंडळांनी खास स्वागताची तयारी केली असून, मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळीच निघणार असून, ढोल-ताशा पथकांच्या निनादात वाजतगाजत गणरायाचे पुण्यानगरीत स्वागत होणार आहे.