हॅलो...! HR बोलतोय..; पार्टटाइम जॉबच्या नावे तरुणाची केली साडेआठ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:42 IST2025-10-30T18:41:07+5:302025-10-30T18:42:02+5:30
चोरांनी त्यांना पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने टाइम्स इंटरनेट इंडिया प्रायव्हेट लि. मधून एचआर बोलत असल्याचे सांगितले.

हॅलो...! HR बोलतोय..; पार्टटाइम जॉबच्या नावे तरुणाची केली साडेआठ लाखांची फसवणूक
पुणे : पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने एचआर बोलत असल्याची बतावणी करत तरुणाची सायबर चोरांनी साडेआठ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात बँकधारक, मोबाइलधारक यांच्यासह सुनील शान्मा या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडीतील ३२ वर्षीय तरुणाला सायबर चोरांनी १३ ते १६ सप्टेंबर दरम्यान संपर्क साधला. चोरांनी त्यांना पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने टाइम्स इंटरनेट इंडिया प्रायव्हेट लि. मधून एचआर बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर गुगल लिंक, बँक खाते यावर पैसे पाठवण्यास सांगितले. तक्रारदाराने ८ लाख ५१ हजार २८० रुपये पाठवल्यानंतर त्या बदल्यात ना जॉब ना सायबर चोरांनी दिलेली आश्वासाने पूर्ण झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.
ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाखाली ७ लाखांना फसवले...
कोंढवा परिसरातील ४२ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरांनी संपर्क साधत ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवत तक्रारदाराने ७ लाख २ हजार ६२९ रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने तक्रारदाराने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावेळी पोलिसांनी व्हॉट्सॲप नंबर धारक अवंतिका देव, हेल्थ एक्स्चेंज, बे बोको प्रो ॲप आणि आयसीआयसीआय बँकधारक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक घाडगे करत आहेत.
प्रीपेड टास्कच्या नावाखाली ५ लाख ७६ हजारांची फसवणूक
खराडी येथील ३२ वर्षीय युवकाला सायबर चोरांनी ३१ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत संपर्क साधत प्रीपेड टास्क देऊन ते पूर्ण करण्यासाठी पैसे पाठवण्यास सांगून ५ लाख ७६ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोबाइल नंबरधारक, गुगलचे लिंकधारक तसेच वेगवेगळ्या बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता करत आहेत.