पुणे : गणेश विर्सजन मिरवणुकी दरम्यान लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चाैकात अंनत चर्तुदशी दिवशी एका न्यूज पाेर्टलच्या २० वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला पत्रकाराचा ढाेल ताशा पथकातील दाेन जणांनी धक्काबुक्की करत रस्त्यावर ढकलून देऊन विनयभंग केल्याचा प्रकार घडला हाेता. या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए.पांडे यांनी दोघांची कारागृहात रवानगी केली.
याप्रकरणी पीडित तरुणीने फरासखाना पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करुन दाेन आरोपींना अटक केली होती. मात्र, आरोपींचे अँड प्रताप परदेशी यांनी युक्तिवादादरम्यान अजब दावा केला की, बेलबाग चाैकात विर्सजन मिरवणुकीच्या दिवशी इतकी गर्दी असते की पाेलीस आयुक्त यांना देखील धक्काबुक्की हाेऊ शकते. बेलबाग चाैकात मिरवणुकीवेळी माझी देखील गर्दीमुळे पँट फाटली. त्यामुळे आरोपींनी केलेली घटना जाणीवपूर्वक केलेले कृत्य नाही. मी दगडूशेठ गणपती ट्रस्टच ट्रस्टी असून, आम्हाला देखील विर्सजन मिरवणुकीच्या वेळी धक्काबुक्की हाेते. मुलीच्या पायावरुन केवळ ट्राॅलीचे चाक गेल्याचा प्रकार घडला अाहे. हजाराे लाेकांची गर्दी असलेल्या चाैकात हा प्रकार घडला. अाराेपी यांची काेणती गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून, त्यांच्या करिअरवर या प्रकरणाचा दुष्परिणाम हाेईल. मी पत्रकार संघाचा देखील निवडणूक अधिकारी असून, त्याचे सर्व सदस्य मला माहिती आहेत. त्यामध्ये ही पाेर्टलसाठी काम करणारी तरुणी संघाची सदस्य नाही.
अनाेज बबन नवगिरे (वय- ३४,रा. मंगळवार पेठ,पुणे) व चिराग नरेश किराड (२४,रा. लाल देऊळ साेसायटी ,पुणे) अशी न्यायालयीन काेठडी झालेल्या दाेघांची नावे आहेत. हे दाेघे त्रिताल ढाेल ताशा पथकातील सदस्य आहे. पाेलिसांनी यासंर्दभात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्रिताल ढाेल ताशा पथकाचे प्रमुख मनाेज बबन नवगिरे यांना फरासखाना पाेलीस ठाण्यात बाेलवून घेतले. त्यांचे समक्ष झालेल्या प्रकाराबाबत फरासखाना पाेलीस स्टेशन येथील कंट्राेल रुममध्ये तक्रारदार यांचे समक्ष सीसीटीव्ही फुटेज बघत असताना, तक्रारदार यांना छेडछाड व धक्काबुक्की करणा-या दोन आरोपींना ओळखले. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, महिला सुरक्षेसंर्दभातील दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. दाखल गुन्हयातील घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पंचनामा करुन पुरावेकामी जप्त केले आहे. आरोपींनी हा गुन्हा जाणीवपूर्वक केला असून, त्यांच्याकडे त्याबाबत तपास करणे आहे. महिला पत्रकार ही घटनेवेळी मिरवणूक पाहण्यासाठी नव्हे तर त्याचे वार्तांकन करण्यासाठी गेली हाेती. तिने याबाबत स्वत: पाेलिसांकडे जाऊन तक्रार दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक पूनम पाटील करत आहेत.