बिबट्याच्या नावाखाली खून; पोलीस तपासात धक्कादायक उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:00 IST2025-03-04T15:58:48+5:302025-03-04T16:00:26+5:30

आरोपीने खुनाची कबुली दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली

pune district Murder in the name of leopard; Shocking revelation in police investigation | बिबट्याच्या नावाखाली खून; पोलीस तपासात धक्कादायक उलगडा

बिबट्याच्या नावाखाली खून; पोलीस तपासात धक्कादायक उलगडा

यवत - दोन महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्याचे नाटक करून चुलतीचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवत पोलिसांच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि फौजदार सलीम शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हा कट उघड झाला. चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

७ डिसेंबर २०२४ रोजी लता धावडे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली होती त्यानुसार पुतण्या अनिल धावडे यांनी तक्रार दिली होती. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला होता. तर महिलेला झालेल्या जखमा नक्की कशामुळे झाल्या यासाठी व्हीसेरा तपासणी साठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. वैद्यकीय अहवाल नंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून खरी घटना उघडकीस आणली आहे.

खुनाचा कट आणि सत्य उघड

३ मार्च २०२५ रोजी पोलीस तपास सुरू असताना फौजदार सलीम शेख यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सतीलाल मोरे हा संशयास्पद वाटला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने लता धावडे यांच्या खुनाची कबुली दिली.

अनैतिक संबंध आणि पैशांचा व्यवहार 

अनिल धावडे आणि त्याची चुलती लता धावडे यांच्यात अनैतिक संबंध होते. दोघे शेतात भेटत असत. मात्र, काही दिवसांपासून लता धावडे भेटायला येत नव्हती आणि पैशांची मागणी करत होती. त्यामुळे अनिल धावडेने सतीलाल मोरे याला "तुला दीड लाख रुपये देतो, आपण दोघे मिळून तिला संपवू," असे सांगितले.

खून आणि बनाव

ठरल्याप्रमाणे सतीलाल मोरे आणि अनिल धावडे यांनी लता धावडे यांचा चेहरा व डोके ठेचून ठार मारले. यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचला. गावकऱ्यांना आणि पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी दोघांनी मृतदेह शेताच्या बाजूला टाकून, "बिबट्याने हल्ला करून ठार केले," असे खोटे सांगितले.

पोलीस तपास आणि आरोपींना अटक

मात्र, शवविच्छेदन आणि नागपूर प्रयोगशाळेच्या अहवालात हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्याने झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिसांनी सखोल तपास करत आरोपींना जेरबंद केले. अनिल धावडे आणि सतीलाल मोरे यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर दौंड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. बिबट्याचा हल्ला म्हणून समजला गेलेला प्रकार हा खून असल्याचे उघड झाल्याने गावकरीही चकित झाले आहेत.

Web Title: pune district Murder in the name of leopard; Shocking revelation in police investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.