कात्रज डेअरी, पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात;‘मिसळ हाउस’ने उडवली दुधाच्या जागेची अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:43 IST2025-11-07T15:38:53+5:302025-11-07T15:43:35+5:30
दुग्ध विकास विभागाच्या उपनिबंधकांनी या प्रकरणास परवानगी कशी दिली, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

कात्रज डेअरी, पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात;‘मिसळ हाउस’ने उडवली दुधाच्या जागेची अट
- दुर्गेश मोरे
पुणे :पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, म्हणजेच कात्रज डेअरी, पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कात्रज डेअरीच्या जागेवरील आरक्षण बदलताना राज्य सरकारकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ‘दुग्ध व्यवसायाशी संबंधित इतर कोणत्याही व्यवसायासाठी ही जागा वापरण्यात येणार नाही’, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. तरीही अध्यक्षांच्या पुढाकाराने डेअरीच्या आवारात ‘मिसळ हाउस’ सुरू करण्यात आले. या निर्णयामुळे अनेक संचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुग्ध विकास विभागाच्या उपनिबंधकांनी या प्रकरणास परवानगी कशी दिली, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
संचालकांच्या मते, डेअरीचा परिसर हा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीपुरताच मर्यादित असावा, अन्य व्यवसाय चालवणे ही अटींची पायमल्ली आहे. पूर्वी डेअरीतील कर्मचाऱ्यांच्या पत्नींच्या नावावर एक संस्था स्थापन करून त्यांना डेअरीच्या आवारात विक्री काउंटर देण्यात आले होते. नंतर हा काउंटर काढून घेतला गेला; मात्र त्याच आवारात आता मिसळ हाउस सुरू करण्यात आल्याने ही बाब पुन्हा चर्चेत आली आहे. नियमांचे उल्लंघन करून हे परवानगीप्रकरण कसे मंजूर झाले, याबाबत दुग्ध विकास विभागाकडेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, डेअरीतील महत्त्वाच्या निर्णयांवर प्रशासनाचा प्रतिकूल अभिप्राय नोंदवला असतानाही अध्यक्षांनी स्वतःच्या अधिकारात ते मंजूर केल्याचे संचालकांनी आरोप केले आहे. संघाच्या कारभारात संचालक मंडळाला विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याची तक्रार वारंवार केली जात आहे.
आकड्यावरून डेअरीचा व्याप घटल्याचे दिसते चित्र
अध्यक्ष हे शिरूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. तथापि, त्यांच्या कार्यकाळात त्या भागातून दूध संकलनात अपेक्षित वाढ झालेली नाही. उलट, काही ठिकाणी संकलन घटल्याचे संचालकांचे म्हणणे आहे. डेअरीच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्याऐवजी वादग्रस्त निर्णय घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
कात्रज डेअरीची ब्रॅण्ड प्रतिमा आणि विक्री वाढविण्यासाठी आवश्यक मार्केटिंग आणि वितरण प्रणाली मागे पडली आहे. प्रतिस्पर्धी दूध संघ आणि खासगी कंपन्यांनी बाजारपेठेवर पकड वाढवली असताना कात्रज डेअरीचा व्याप घटल्याचे आकडे दाखवत आहेत.
सर्वसाधारण सभेत घडामोडींची शक्यता
सर्वसाधारण सभा झाल्यानंतर पदाधिकारी बदलण्याची प्रथा असून, अनेक संचालकांनी नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बदलाचा ठराव मांडला जाण्याची शक्यता असून, यावरून संघात मोठी राजकीय चुरस निर्माण होऊ शकते.
लेखापरीक्षणामध्ये वारंवार या बंद गाळ्यांबाबत विचारण्यात आले होते. दूध संघाला आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टिकोणातून संचालक मंडळाने ठराव करून ही जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. शिवाय दुग्ध विकास विभागाच्या उपनिबंधकांनीही जागा भाड्याने देण्यास मान्यता दिली आहे. - स्वप्नील ढमढेरे, अध्यक्ष, कात्रज दूध संघ