"भगव्याची शपथ घेणाऱ्यांना आता हिंदुत्ववादी म्हणवून घेण्यास लाज वाटते", फडणवीसांचे शिवसेनेवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 21:50 IST2021-12-03T21:50:35+5:302021-12-03T21:50:52+5:30
भारतातच लस तयार करून 100 कोटी भारतीयांना ही लस नरेंद्र मोदींनी मोफत दिली

"भगव्याची शपथ घेणाऱ्यांना आता हिंदुत्ववादी म्हणवून घेण्यास लाज वाटते", फडणवीसांचे शिवसेनेवर टीकास्त्र
पुणे : पुणे महानगरपालिकेजवळ भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच भाजपच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी विविध मुद्दयांवर भाष्य करत असताना महाविकास आघाडीबरोबरच त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ''भगव्याची शपथ घेणारे आता अशा लोकांसोबत आहेत. ज्यांना भगव्याचा मान आणि सन्मानही नाही त्यांना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेण्यास लाज वाटत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे.
फडणवीस म्हणाले, येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिकेवर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकणार आहे. अलीकडच्या काळात मला भाजपचा भगवा असं स्पेसिफिक सांगावे लागत आहे. कारण भगव्याची शपथ घेणारे आता अशा लोकांसोबत आहे. ज्यांना भगव्याचा मान ही नाही सन्मानही नाही, त्यानं आता स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेण्यास लाज वाटते. हि लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नरेंद्र मोदींनी वैज्ञानिकांना सोबत घेऊन कोरोना वॅक्सिन तयार केली
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जर भारतीय वॅक्सिन तयार झाल्या नसत्या तर काय अवस्था झाली असती. अमेरिका, इंग्लंड, रशिया या सारख्या देशांनी आमचं लसीकरण झाल्याशिवाय तुम्हाला लस देणार नाही. तोपर्यंत तुम्ही जगले काय किंवा मेले काय आम्हाला काही परवा नाही. नरेंद्र मोदींनी सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटॅक्स आणि येथील वैज्ञानिकांना सोबत घेऊन त्यांचं मनोधैर्य वाढवले. त्यांना आवश्यक ती मदत करून, खासगी कंपनी की सरकारी कंपनी याचा विचार न करता त्यांना आगावू पैसे दिले. आणि भारतातच लस तयार केली. आणि 100 कोटी भारतीयांना ही लस नरेंद्र मोदींनी मोफत दिली.
नरेंद्र मोदींनी राज्याला लसी दिल्या
महाराष्ट्र सरकारचे दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार 10 कोटीपेक्षा अधिक लोकांना लसी दिल्याचे सांगत होते. आम्ही लसीकरणात नंबर वन असल्याचे सांगत होते. या लसी तुम्हाला नरेंद्र मोदींनी दिल्या म्हणून तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करू शकला आहात. आणि हेच लोक रोज उठून नरेंद्र मोदींच्या नावाने शंखनाद करत असतात.