बुधवार पेठेत हातवारे करून ग्राहकांना बोलवणे दोन तरुणींना पडले महागात; गुन्हा दाखल; फरासखाना पोलिसांची कारवाई
By किरण शिंदे | Updated: December 14, 2025 17:10 IST2025-12-14T17:09:16+5:302025-12-14T17:10:13+5:30
बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर या दोन महिला उभ्या राहून हातवारे करत ग्राहकांना आकर्षित करत होत्या.

बुधवार पेठेत हातवारे करून ग्राहकांना बोलवणे दोन तरुणींना पडले महागात; गुन्हा दाखल; फरासखाना पोलिसांची कारवाई
पुणे - बुधवार पेठेतील सार्वजनिक रस्त्यावर उघडपणे हातवारे करून ग्राहकांना बोलावणं दोन तरुणींना चांगलचं महागात पडलं आहे. फरासखाना पोलिसांनी या २ तरुणींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित महिलांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे.
फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला पोलिस हवालदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर या दोन महिला उभ्या राहून हातवारे करत ग्राहकांना आकर्षित करत होत्या. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांसमोर जाणूनबुजून अंगविक्षेप आणि अश्लील हावभाव करत अडथळा निर्माण करत होत्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील दोन्ही तरुणींचे वय अनुक्रमे ३१ आणि ३२ वर्षे असून त्या मूळच्या पश्चिम बंगालच्या आहेत. मागील काही महिन्यांपासून त्या बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अश्लील हावभाव करून नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे फरासखाना पोलिसांकडून सांगण्यात आले. संबंधित तरुणींना सध्या नोटीस देण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई तपासानंतर करण्यात येणार आहे. बुधवार पेठ परिसरात सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.