पुणे : वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून पसार झालेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आरोपींबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. करण शिवाजी जमादार (वय १९, रा. सिंहगड महाविद्यालयाजवळ, वडगाव बुद्रुक), शुभम साधू चव्हाण (१९, रा. रियांश सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ४ सप्टेंबरला फिर्यादी महिलेचा मुलगा मित्रांबरोबर मोबाइलवर गेम खेळत होता. त्यावेळी आरोपी करण, शुभम आणि दोन अल्पवयीन साथीदार तेथे दुचाकीवरून आले. आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले, तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनांना ताब्यात घेतले.