भांडगाव : खोर (ता. दौंड) येथील डोंबेवाडी परिसरातील ढोरजे वस्तीवर झालेल्या धाडसी घरफोडीने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आणला आहे. ज्ञानेश्वर बबन डोंबे (वय ३२) हे आपल्या कुटुंबासह अक्कलकोट, तुळजापूर आणि सोनोरी येथे देवदर्शनासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोने-चांदी व रोख रक्कम लंपास केली.
रविवारी मध्यरात्री परतल्यानंतर घरासमोरील वीज बंद आणि कुलूप तुटलेले दिसताच हा प्रकार उघडकीस आला. साडेसात तोळे सोने, चांदीच्या पट्ट्या व रोख २ लाख ३५ हजार रुपये असा एकूण सुमारे १४ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. जुन्या पावत्यानुसार सोन्याची किंमत पावणेसात लाख रुपये असली तरी सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत तब्बल ११ लाख २४ हजार रुपये आहे.
यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून, ठसे संकलित करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांची माहिती तपासली जात आहे. या घटनेमुळे खोर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्री गस्त वाढवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.