Pune Crime: पुणे शहरात चोरीच्या घटना थांबेना, लाखांचा मुद्देमाल लंपास
By नितीश गोवंडे | Updated: February 4, 2024 15:38 IST2024-02-04T15:38:03+5:302024-02-04T15:38:31+5:30
डेक्कन आणि चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Pune Crime: पुणे शहरात चोरीच्या घटना थांबेना, लाखांचा मुद्देमाल लंपास
पुणे :चोरीच्या दोन घटनांमध्ये २ लाख ४२ हजार ४५८ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी डेक्कन आणि चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत, शैलेश संतोष निमदे (३०, रा. जनता वसाहत विकास मित्र मंडळ, गल्ली नं. ३५) हे २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांचे जंगली महाराज रस्त्यावरील दुकान बंद करून घरी गेले होते. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. दुकानात जाऊन बघितले असता निमदे यांच्या दुकानातील १० हजार रोख आणि २ हजार ४५८ रुपयांच्या शॉर्टपँट चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेचच डेक्कन पोलिस ठाण्यात जात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी सुपेकर या करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, हडपसर परिसरातील डीपी रस्त्याच्या मागे राहणाऱ्या अनिता अभिमान हेळकर (४०) या २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घराला कुलूप लावून सुपे येथे गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात अज्ञात चोराने घराचे कुलूप तोडत कपाटातील २ लाख ३० हजार रुपयांचे ७ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे हेळकर यांनी हडपसर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कुदळे करत आहेत.