सिक्कीममधील कंपनीच्या नावे बनावट औषधांची विक्रीचा प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 18:25 IST2025-12-13T18:24:57+5:302025-12-13T18:25:19+5:30
‘एफडीएकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. बनावट औषधांची विक्री किंवा खरेदी केल्यास सात ते दहा वर्षांचा कारावास किंवा दहा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा आहे.

सिक्कीममधील कंपनीच्या नावे बनावट औषधांची विक्रीचा प्रकार उघड
पुणे : सिक्कीममधील औषध कंपनीच्या नावे बनावट ओैषध विक्रीचा प्रकार अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडकीस आणला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी आठजणांविरुद्ध शुक्रवारी (दि.१२) गुन्हा दाखल केला. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागातील निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदाशिव पेठ, कर्वे रस्ता, उत्तर प्रदेशातील लखनौ, तसेच बिहारमधील गोपालगंज भागातील ओैषध विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीममधील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या टिप्सिन या बनावट ओैषधाची विक्री होत असल्याची माहिती ‘एफडीए’च्या पथकाला मिळाली. १६ ऑक्टोबर रोजी ‘एफडीए’च्या पथकाने सदाशिव पेठेतील एका वितरकाच्या दुकानातून ओैषधाचे नमुने ताब्यात घेतले. सदाशिव पेठेतील औषध वितरकाने उत्तर प्रदेशातील लखनौ येथील एका वितरकाकडून ओैषध खरेदी केल्याची माहिती मिळाली. एफडीएच्या पथकाने लखनौतील वितरकाची चौकशी केली. तेव्हा गोपालगंजमधील एकाने दोन कोटी २३ लाख रुपयांची ओैषध खरेदी केली होती. ही रक्कम त्याने एकाला रोख स्वरूपात दिली होती. गोपालगंजमधील कंपनीच्या परवान्याची मुदत २० नोव्हेंबर २०२४ रोजी संपल्याची माहिती चौकशीत मिळाली.
हे औषध सिक्कीममधील टेरेंट फार्मास्युटिकल्स कंपनीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. तेव्हा बनावट ओैषध विक्रीचा प्रकार उघडकीस आला. ‘एफडीएकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. बनावट औषधांची विक्री किंवा खरेदी केल्यास सात ते दहा वर्षांचा कारावास किंवा दहा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा आहे.