Pune Crime : कोयता गँगची दहशत; वानवडीतील भैरोबानाला परिसरात नऊ वाहनांची तोडफाेड
By नम्रता फडणीस | Updated: November 22, 2024 16:13 IST2024-11-22T15:54:32+5:302024-11-22T16:13:34+5:30
कोयते उगारून दहशत माजविण्याचा प्रयत्न

Pune Crime : कोयता गँगची दहशत; वानवडीतील भैरोबानाला परिसरात नऊ वाहनांची तोडफाेड
पुणे : वानवडीतील भैरोबानाला परिसरात टोळक्याने मोटार, रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा नऊ वाहनांची तोडफोड करीत कोयते उगारुन दहशत माजवली. याप्रकरणी पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मयूर उत्तम गायकवाड (वय ३२, रा. चिमटा वस्ती, भैरोबानाला पुणे-सोलापूर रस्ता, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भैरोबानाला परिसरात सेंट पॅट्रीक चर्चजवळ चिमटा वस्ती आहे. गुुरुवारी दुपारी टोळी वस्तीत शिरली. त्यांच्याकडील कोयते आणि दांडके उगारुन टोळक्याने दहशत माजविली. या भागातील मोटारी, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची दांडक्याने तोडफोड करुन टोळक्याने रहिवाशांना शिवीगाळ केली.
या घटनेनंतर मयूर गायकवाड घरातून बाहेर पडले. तेव्हा टोळक्याने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. कोणी मध्ये पडले तर त्याला जीवे मारु’, अशी धमकी देऊन टोळके पसार झाले. पसार होताना टोळक्याने या भागातील कालव्याजवळ लावलेली दुचाकी आणि रिक्षाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक फौजदार कुंभार तपास करत आहेत. पसार झालेल्या टोळक्याच्या शोध घेण्यात येत आहे.