वानवडी - सोशल मीडियावर धमकी देऊन खंडणी मागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच, इन्स्टाग्रामवर फेक आयडी तयार करून न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी आरोपी रघुवर बलराम चौधरी (वय १९, रा. हडपसर, मूळ बिहार) याला पोलिसांनीअटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुवर चौधरी याने संबंधित महिलेच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार केले. त्यानंतर, तिचे फोटो एडिट करून न्यूड स्वरूपात बदलले आणि तेच फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले. फोटो डिलीट करण्याच्या बदल्यात त्याने महिलेच्याकडून २,००० रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास एडिट केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर, वानवडी पोलीस ठाण्याच्या सायबर टीममधील पोलीस हवालदार अमोल पिलाणे आणि अतुल गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून रघुवर बलराम चौधरी याला अटक केली.