पुणे : पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे तीन वर्षापासून प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या बहिणीने काल पोलिसात फिर्याद दिली होती
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी फिर्यादी यांनी त्यांच्या १६ वर्षीय बहिणीला क्लास साठी सोडलं होतं. मात्र क्लास संपल्यानंतर ती परत न आल्याने त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दरम्यान एका संशयित मुलाचा देखील तपास याप्रकरणात करायला सुरुवात केली. तो मुलगा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र त्याचा मोबाईल फोन बंद होता. आज खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात २ मृतदेह मिळून आल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी धाव घेत याबाबतची माहिती वानवडी पोलिसांना कळवली. या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
विषप्राशन करून संपवले जीवन
खडकवासला परिसरातील जंगलात विष प्राशन करून दोघांनी आत्महत्या केली. ज्या ठिकाणी आत्महत्या केली. त्याठिकाणी पोलिसांना कुठली ही सुसाइड नोट मिळाली नसून विषाचा डबा मिळून आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.