बुलाती है मगर जाने का नहीं..! इंस्टाग्रामवर ओळख, भेटीचं आमिष अन् थेट ब्लॅकमेलिंग; पुण्यात तरुणीकडून तरुणाची लूट
By किरण शिंदे | Updated: December 10, 2025 12:41 IST2025-12-10T12:41:02+5:302025-12-10T12:41:49+5:30
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका तरुणीसह चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलाती है मगर जाने का नहीं..! इंस्टाग्रामवर ओळख, भेटीचं आमिष अन् थेट ब्लॅकमेलिंग; पुण्यात तरुणीकडून तरुणाची लूट
पुणे - इंस्टाग्रामवर ओळख करून मैत्री वाढवण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीने भेटीचं आमिष दाखवून तरुणाला सापळ्यात अडकवत त्याच्याकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका तरुणीसह चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, २८ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, इंस्टाग्रामवर “रसिका” (नाव बदलले आहे) नावाच्या तरुणीशी त्याची ओळख झाली होती. दोघेही दररोज सतत चॅटिंग करायचे आणि काही दिवसांतच त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यानंतर एके दिवशी रसिकाने या तरुणाला भेटण्यासाठी कात्रज परिसरात बोलावले. भेटीच्या आमिषाने तरुण बाईकवर कात्रजला गेला. दोघांची भेट झाल्यानंतर काही वेळातच रसिकाने कात्रज घाटात जाण्याचा आग्रह धरला. घाटाच्या दिशेने जात असताना एका ठिकाणी तिने गाडी थांबवायला सांगितले. गाडी थांबताच आधीच दबा धरून बसलेले रसिकाचे साथीदार तिथे आले. त्या सर्वांनी तरुणाला धमकी देत येवलेवाडी परिसरात जबरदस्तीने नेले. तिथे त्याला मारहाण करण्यात आली, शिवीगाळ केली आणि POCSO गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून ७० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, त्याच्याकडे इतकी रक्कम नसल्याने आरोपींनी त्याच्याकडील दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि उर्वरित पैशांसाठी सतत फोन करून धमकावण्यास सुरुवात केली.
दरम्यान, सततच्या धमक्या आणि त्रासाला कंटाळून अखेर तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी रसिका आणि तिच्या मित्रांविरोधात गुन्हा नोंदवला असून, सर्व आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात करत आहेत.