पुणे : स्वित्झर्लंडमध्ये पळून गेलेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ व त्याच्या टोळ्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. पोलिसांनी नीलेश घायवळसह त्याच्या कंपन्या व कुटुबीयाची १० बँक खात्यातील ३८ लाख २६ हजार रुपये गोठवले (फ्रीज) आहेत. कोथरूड भागात किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला गुंड नीलेश घायवळ ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगरमधून त्याने ‘तत्काळ’ पारपत्र मिळविले आहे. या पारपत्र प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करीत आहेत.
दरम्यान, घायवळच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी विविध बँकांशी पत्रव्यवहार करून माहिती घेत नीलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती नीलेश घायवळ, कुसुम घायवळ, पृथ्वीराज इंटरप्रायझेस अशा साधारण १० बँक खात्यांतील ३८ लाख २६ हजार रुपये गोठवल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यामुळे पुणे पोलिसांच्या एनओसीशिवाय आता संबंधितांना रक्कम काढता येणार नाही.
कुख्यात नीलेश घायवळ याने स्वतःच्या आडनावात फेरफार करून पासपोर्ट मिळवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घायवळऐवजी गायवळ असे नाव त्याने पासपोर्टसाठी वापरले आहे. त्याला पासपोर्ट बनविण्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येकाची कुंडली पुणे पोलिसांकडून तपासली जात आहे.