पुणे - वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राड्याला आता नवा नाट्यमय ट्विस्ट मिळालाय. या प्रकरणात आमदार बापू पठारे आणि त्यांच्या समर्थकांना झालेल्या धक्काबुक्कीची चर्चा रंगली असताना, “मार खाणारा सचिन पठारे मी नाही” असं म्हणत ॲड. सचिन पठारे यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं आहे.
शनिवारी लोहगाव येथील गाथा लॉन्स मध्ये आमदार बापू पठारे एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांचं आणि बंडू खांदवे यांचं शाब्दिक चकमकीत रूपांतर झालं. या वादानंतर दोन्ही गटातील समर्थकांमध्ये गोंधळ उडाला आणि काहींना मारहाण झाल्याची माहिती मिळाली. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी बंडू खांदवे यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या राड्यात ‘सचिन पठारे’ नावाच्या तरुणाला मारहाण झाली असल्याचं वृत्त आल्यानंतर, त्याच नावाचा दुसरा तरुण – ॲड. सचिन पठारे – चर्चेत आला. मात्र त्यांनी स्पष्ट केलं की, “मार खाणारा सचिन पठारे मी नाही. माझं या घटनेशी काहीही संबंध नाही. नामसाधर्म्यामुळे अनेक जण मला फोन करून विचारपूस करत आहेत, ज्यामुळे मला मानसिक त्रास होत आहे.
ॲड. पठारे हे भाजपचे कार्यकर्ते असून पूर्वी आमदार बापू पठारे यांचे समर्थक होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. ते म्हणाले, मी आगामी महानगरपालिका निवडणुका लढविण्याची तयारी करत आहे. मात्र या घटनेमुळे माझी विनाकारण बदनामी झाली आहे. याचा माझ्या प्रतिमेवर परिणाम होत आहे.
तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, आता माझे आणि बापू पठारे यांचे कोणतेही संबंध नाहीत. या घटनेत माझं नाव जोडणं चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. या साऱ्या घडामोडींमुळे वडगाव शेरी मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चांगलंच तापलं असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राडा नक्की कोणत्या दिशेने वळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Advocate Sachin Pathare clarifies he wasn't the 'Sachin Pathare' assaulted in the Wadgaon Sheri incident involving MLA Bapu Pathare. He denies involvement, citing name similarity causing him distress and damaging his reputation as a BJP worker preparing for elections.
Web Summary : वकील सचिन पठारे ने स्पष्ट किया कि वह विधायक बापू पठारे से जुड़े वडगांव शेरी की घटना में हमला किए गए 'सचिन पठारे' नहीं थे। उन्होंने शामिल होने से इनकार किया, नाम की समानता के कारण उन्हें परेशानी हो रही है और चुनाव की तैयारी कर रहे भाजपा कार्यकर्ता के रूप में उनकी प्रतिष्ठा को नुकसान हो रहा है।