Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

By किरण शिंदे | Updated: June 19, 2025 00:21 IST2025-06-19T00:21:09+5:302025-06-19T00:21:58+5:30

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली.

Pune Crime News: Married woman jumps from fifth floor with child after writing a note with lipstick | Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. एका ३१ वर्षीय विवाहितेने ६ वर्षीय चिमुरड्यासह बिल्डिंगच्या टेरेसवरून खाली उडी मारली. यात या महिलेचा आणि चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबेगाव परिसरात ही घटना घडली. पोलिसांना या ठिकाणाहून एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यात लिपस्टिकने नंदेच्या त्रासाला कंटाळून मी हा निर्णय घेत असल्याचे नमूद केले आहे. 

मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१, फ्लॅट नं १०२, जी विंग, कल्पकसृष्टी सोसायटी, दळवी नगर, आंबेगाव) आणि विष्णु शशिकांत देशमुख (वय ६) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. आंबेगाव बुद्रुक पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी असलेल्या मयुरी पती आणि सहा वर्षे मुलासोबत आंबेगाव बुद्रुक परिसरातील कल्पकसृष्टी सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या पतीसह खामगाव येथे गेल्या होत्या. मात्र तिथे गेल्यानंतर सासरच्या लोकांसोबत त्यांचे भांडण झाले. आणि त्यानंतर मुलाला घेऊन त्या एकट्याच पुण्यात परतल्या होत्या. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास त्यांनी राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवरून मुलासह खाली उडी मारली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आंबेगाव बुद्रुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या इमारतीच्या टेरेसवरून मयुरी यांनी खाली उडी मारली होती, तेथे पोलिसांना एका वहीत लिपस्टिकने चिठ्ठी लिहिल्याचे आढळले. ज्यामध्ये नंदेच्या त्रासाला कंटाळून मी हा निर्णय घेत असल्याचे त्यात लिहिले होते. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून, तिच्या नातेवाईकांना याची माहिती दिली आहे. या महिलेचा पती आणि इतर नातेवाईक खामगाव येथून पुण्यात येण्यासाठी निघाले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Pune Crime News: Married woman jumps from fifth floor with child after writing a note with lipstick