leopard : दररोज बिबट्याचे दर्शन; वडगाव काशिंबेग गावात दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 13:09 IST2025-09-21T13:08:44+5:302025-09-21T13:09:07+5:30
आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे.

leopard : दररोज बिबट्याचे दर्शन; वडगाव काशिंबेग गावात दहशत
मंचर : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील गावठाणात गेल्या महिनाभरापासून दोन पिल्लांसह एक मादी बिबट्या वास्तव्यास आहे. दररोज बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत असून, सायंकाळी सहानंतर गावात शुकशुकाट पसरतो. बिबट्याच्या दहशतीमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून, ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबटे मुक्तपणे संचार करत असून, पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. वडगाव काशिंबेग हे बिबट्यांचे हॉटस्पॉट बनले आहे. गावातील पडकी घरे आणि झाडाझुडपांचा आडोसा घेऊन बिबट्या दिवसभर लपून राहतो आणि सायंकाळी बाहेर पडतो. दोन पिल्लांसह फिरणाऱ्या मादी बिबट्यामुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सायंकाळी सहानंतर कोणीही घराबाहेर पडण्यास धजावत नाही, आणि अंधार पडताच गावात शांतता पसरते.
गावातील प्रशांत तारू, सुधाकर अल्हाट आणि लक्ष्मण डोके यांना यापूर्वी बिबट्याचे दर्शन झाले आहे. संत सावता महाराज मंदिराजवळ बिबट्या फिरताना अनेकांनी पाहिला आहे. शुक्रवारी रात्री बिबट्याने अर्धपीठ गणपती मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर ठाण मांडले. पुजारी राजेंद्र तिवारी यांनी बिबट्याला प्रथम पाहिले. ही माहिती गावातील तरुणांना मिळताच, निखिल तारू (पोलिस पाटील), चंद्रकांत पिंगळे, संकेत बिडवई आणि शैलेश गायकवाड यांनी मंदिराकडे धाव घेतली. त्यावेळी पायऱ्यांवर बसलेला बिबट्या त्यांना दिसला. काही तरुणांनी बिबट्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हालचाली पाहून त्यांनी सुरक्षित ठिकाणी जाणे पसंत केले. बिबट्याच्या वावराची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे पथक गावात येऊन पाहणी करून गेले. त्यांनी सांगितले की, मादी आणि तिची पिल्ले एकत्र फिरत आहेत. जर एखादा बिबट्या पिंजऱ्यात अडकला, तर बाहेर राहिलेला बिबट्या त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे सध्या कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
गावात उसाचे क्षेत्र वाढल्याने बिबट्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा मिळते. शिवाय, गावठाणातील पडकी घरे बिबट्यांसाठी आडोसा ठरतात. यामुळे बिबट्यांचा गावातील वावर वाढला आहे. सोशल मीडियाद्वारे नागरिकांना वारंवार सावध केले जाते, परंतु तरीही भीती कायम आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. “नागरिकांनी विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी आणि सुरक्षिततेची खबरदारी बाळगावी,” असे आवाहन पोलिस पाटील निखिल तारू यांनी केले आहे.