चौफुला कलाकेंद्रातील गोळीबाराचा तपास संशयाच्या भोवऱ्यात;आरोपीची आदलाबदला केल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 12:40 IST2025-07-27T12:39:57+5:302025-07-27T12:40:10+5:30

- आतापर्यंत चार जणांना केली आहे अटक

pune crime news Investigation into the shooting at Chauphula Kalakendra is shrouded in doubt | चौफुला कलाकेंद्रातील गोळीबाराचा तपास संशयाच्या भोवऱ्यात;आरोपीची आदलाबदला केल्याची चर्चा

चौफुला कलाकेंद्रातील गोळीबाराचा तपास संशयाच्या भोवऱ्यात;आरोपीची आदलाबदला केल्याची चर्चा

दुर्गेश मोरे

पुणे:
दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी (दि. २१) रोजी झालेल्या गोळीबार प्रकरण आधी दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आता पोलिसांचा तपासच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याप्रकरणी आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह चौघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये एका आरोपीची आदलाबदल केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झालेली आहे.

न्यू अंबिका कलाकेंद्रात सोमवारी (दि. २१) रोजी गोळीबार झाला होता. मात्र, गोळीबार झाल्यापासून ते आरोपींना अटक करण्यापर्यंत पोलिसांकडून केवळ लपवाछपवी सुरूच होती. मंगळवारी समाजमाध्यमांवर ही गोळीबाराची बातमी व्हायरल झाली. पण तरीही कोणाचीही तक्रार नसल्याचे कारण सांगत पोलिसांनी कोणतीही माहिती घेतली नाही. मात्र, समाजमाध्यमांच्या वाढत्या दबावामुळे अखेर यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. कला केंद्रातील सीसीटीव्हीसुद्धा पाहिले. तसेच, तिन्ही कलाकेंद्रांच्या मालकांकडेही चौकशी केली. सुरुवातीला अशी घटनाच घडली नसल्याचे सांगण्यात येत होते. अखेर न्यू अंबिका कलाकेंद्रात गोळीबार झाल्याचे समोर आले.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत बुधवारी (दि.२३) ३६ तासानंतर गोळीबार झाल्याचे सांगत संशयीत आरोपींची नावे जाहीर केली. त्यामध्ये बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे, रघुनाथ आव्हाड यांची नावे जाहीर केली. पोलिसांनी नेहमीप्रमाणे पिस्तुलाचा परवाना जगताप यांच्या नावावर असल्याचे सांगितले. पण, त्यातून गोळी कोणी झाडली हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. अजूनही किती लोकांचा यामध्ये सहभाग आहे हे देखील स्पष्ट नाही.


गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा

गोळीबार प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा सख्खा भाऊ आणि इतर मुळशी तालुक्यातील गडगंज असलेले संशयीत यामुळे हे प्रचंड प्रमाणात चर्चेत आले होते. त्याचवेळी इतदा लोकप्रतिनिधींच्या भावांची नावेही समोर येत असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळामध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली, पण त्यामध्ये एकाची आदलाबदल करण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मूळातच गोळीबार घडला नसल्यावर ठाम असणाऱ्या पोलिसांचे बिंग फुटलेच आहे, पण आता बदलाबदलीच्या प्रकरणामुळे तर तपासावरच संशय व्यक्त करण्यात येऊ लागला आहे. कारण तांत्रिक तपास झाला की नाही, असा मुद्दाही आता पुढे येऊ लागला आहे.
 

कला केंद्रांना अभय

पोलिसांनी सुरुवातीला तिन्ही कलाकेंद्रांचे मालक, व्यवस्थापक यांच्याकडे चौकशी केली. परंतु तरीही काही झालेच नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे गुन्हा दाखल झाला. पण ज्या कला केंद्रात हा प्रकार घडला त्या कला केंद्राबाबत पोलिसांनी नेमकी काय भूमिका घेतली हेही स्पष्ट झाले नाही. यापूर्वी या कला केंद्रात गोळीबार झाला होता. तर तिथेच असणाऱ्या अन्य एका कलाकेंद्रातही असाच प्रकार घडला होता. पण त्यावेळी हॉकीस्टीकने मारहाण झाल्याचा गुन्हा नोंद झाला. एवढ्या गंभीर घटना घडला असताना पोलिसांना सुगावा लागत नाही हे मात्र, विशेष केवळ तक्रार नाही म्हणून तपास होत नाही किंवा त्याची माहिती घेतली जात नाही हा एकूणच हस्यास्पद प्रकार म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

 
अजून कोणी असेल तर त्यालाही अटक होणार

या प्रकरणासंदर्भात पोलीस अधक्षीक संदीपसिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले, फिर्यादी अंधारे यांना तेथील कलाकारांनी गोळीबार झाल्याचे सांगितले होते. परंतु, नेमका कोणी केला हे सांगू शकत नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. दुसरीकडे गणपत जगताप यांनी आपण गोळी चालवल्याचे सांगितले आहे. तांत्रिकदृष्ट्या अटक केलेले आरोपी त्या ठिकाणी होते हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आदलाबदलचा विषय येत नाही परंतु, तपास सुरु आहे. जर अजून कोणी यात असले तर त्यालाही अटक करण्यात येईल.

सीसीटीव्ही काय कामाचे

पहिल्यांदा नकार देणाऱ्या न्यू अंबिका कला केंद्रातच गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले. पण तेथील सीसीटीव्हीत घटना कैद झाली की नाही, त्या ठिकाणी कोण कोण होते, खरचं सीसीटीव्ही तपासलेत का असा प्रश्नही उपस्थित केले जात आहे.

Web Title: pune crime news Investigation into the shooting at Chauphula Kalakendra is shrouded in doubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.