गुंतवणूक करा,खूप पैसे मिळतील,आमिष महागात;सायबर चोरट्यांकडून एक कोटी २० लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 10:13 IST2025-08-02T10:13:43+5:302025-08-02T10:13:57+5:30

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यापाऱ्याची सायबर चोरट्यांनी २३ लाख ४३ हजारांची फसवणूक केली.

pune crime news Invest, you will get a lot of money, the lure is expensive; Cyber thieves defrauded Rs 1.2 crore | गुंतवणूक करा,खूप पैसे मिळतील,आमिष महागात;सायबर चोरट्यांकडून एक कोटी २० लाखांची फसवणूक

गुंतवणूक करा,खूप पैसे मिळतील,आमिष महागात;सायबर चोरट्यांकडून एक कोटी २० लाखांची फसवणूक

पुणे : शहरात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रमाण वाढीस लागले आहे. दररोज फसवणुकीचे किमान तीन ते चार गुन्हे दाखल होत असून, सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची एक कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यापाऱ्याची सायबर चोरट्यांनी २३ लाख ४३ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरोधात खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६९ वर्षीय व्यापारी हे शुक्रवार पेठेत राहायला आहेत. चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर गुंतवणूक संदर्भातील मेसेज पाठवला होता. चोरट्यांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याच्या आमिषाने व्यापाऱ्याची २३ लाख ४३ हजारांची फसवणूक केली.

गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने वारजे-एनडीए रस्त्यावरील एका तरुणीची सायबर चोरट्यांनी आठ लाख १८ हजारांची फसवणूक केली. याबाबत तरुणीने वारजे पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश बडाख पुढील तपास करत आहेत. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी विमाननगर भागातील एकाची ३८ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कात्रजजवळील आंबेगाव भागात राहणाऱ्या एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाकडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून चोरट्यांनी सहा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस उपनिरीक्षक स्नेहल अडसुळे तपास करत आहेत.

घरातून ऑनलाइन कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची २१ लाख ५२ हजारांची फसवणूक केली. याबाबत एका तरुणाने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाला जाळ्यात ओढले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने पुढील तपास करत आहेत.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने लोहगाव परिसरातील एका तरुणीची चोरट्यांनी पाच लाख १४ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ऑनलाइन टास्कच्या आमिषाने कोंढवा भागातील एका तरुणाची ६५ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची नऊ लाख २९ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली होती. बँक खाते अद्ययावत न केल्यास खाते बंद पडेल, अशी बतावणी करून चोरट्यांनी त्यांची फसवणूक केली. त्यांच्या खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने खात्यातून नऊ लाख रुपये लांबवले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील पुढील तपास करत आहेत. 

Web Title: pune crime news Invest, you will get a lot of money, the lure is expensive; Cyber thieves defrauded Rs 1.2 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.